Madhuri Dixit Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’ या शोची नवीन होस्ट कोण असणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. नव्या होस्टबद्दल हिंट्स देणाऱ्या अनेक पोस्ट ‘सोनी मराठी’ वाहिनीकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्या होत्या. यावरून नवीन होस्ट दुसरी-तिसरी कोणीही नसून माधुरी दीक्षित आहे असा अंदाज चाहत्यांनी आधीच वर्तवला होता. अखेर या सगळ्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’ हा शो होस्ट करणार आहे. नुकताच तिच्या रॉयल एन्ट्रीचा दमदार प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे.

माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’ची नवीन होस्ट असेल हे आज ( १० ऑगस्ट ) जाहीर करण्यात आलं आहे. पण, तुम्हाला माहितीये का? आजचा दिवस माधुरीसाठी खूपच खास आहे. ‘धकधक गर्ल’ने १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा १० ऑगस्ट १९८४ रोजी प्रदर्शित झाला होता. माधुरीच्या इंडस्ट्रीतल्या पदार्पणाला आज बरोबर ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि बरोबर आजच्याच दिवशी ‘कोण होणार करोडपती’चा माधुरीच्या एन्ट्रीचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे हा दिवस अभिनेत्रीसाठी खास ठरला आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा मराठमोळ्या अंदाजात एन्ट्री घेते. तिचा रॉयल लूक पाहून सगळेच भारावून गेले आहेत. माधुरी म्हणते, “जे कधीही घडलं नाही, ते घडणार…महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार…कारण, आता खेळ बदलणार…! सुरू होत आहे…‘कोण होणार करोडपती’! लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.”

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच ‘धकधक गर्ल’च्या चाहत्यांनी तिला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. यापूर्वी स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे, सचिन खेडेकर या कलाकारांनी या करोडपती शोची ( मराठी सीझन ) होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण, यंदा माधुरी प्रेक्षकांना होस्टच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

आता ‘कोण होणार करोडपती’चा हा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच याची माहिती सोनी मराठीकडून शेअर केली जाईल.

दरम्यान, माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘माँ बहन’ सीरिजमध्ये झळकली. यामध्ये तिच्यासह तृप्ती डिमरी, धरना दुर्गा, रवि किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.