Madhuri Dixit Kon Honar Crorepati : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या मराठी शोची होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सहभाग घेतला होता. सोनाली ‘हॅप्पी पेट फाऊंडेशन’साठी तब्बल १२ लाख ५० हजार रुपये जिंकली. यानंतर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ राऊंड खेळून माधुरीसमोर एका-एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे.

येत्या भागात सहभागी होणारी एक स्पर्धक माधुरीकडे अशी काही मागणी करणार आहे, ज्यामुळे तिला धक्काच बसलाय. ही स्पर्धक माधुरीला म्हणते, “मॅम एक छोटीशी विनंती आहे, मला तुमचे 40mm केस हवे आहेत.”

यावर माधुरीचे डोळे विस्फारतात आणि ती म्हणते, “काय? 40mm बापरे! खूपच छोटी इच्छा सांगतेयस हा तू…पण, तुलाही माझी एक इच्छा पूर्ण करावी लागणार आहे. “

आता स्पर्धक मुलीने केलेली ही अजब मागणी ऐकून माधुरी तिला कोणती अट घालणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’ हा शो सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी LIV वर रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “वॉव माधुरी किती डाऊन टू अर्थ आहे”, “Aww माधुरी मॅम खूपच छान दिसत आहेत”, “केस घेऊन काय करणार…मॅम नका देऊ”, “माधुरी मस्त करतेय होस्टिंग” अशा प्रतिक्रिया प्रोमोवर आल्या आहेत.