माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री तर आहेच पण या व्यतिरिक्त ती तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते. आजवर तिने तिच्या नृत्यशैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता तिने सध्या ती सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’मध्ये डान्स करता येणाऱ्या स्त्रीयांबद्दल गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने लोकांना असं वाटतं ज्या स्त्रियांना डान्स करता येतो त्यांना नवऱ्याला तालावर नाचवता येतं असं म्हटलं आहे.
माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम नुकताच १२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच भागात अभिनेत्री सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. शो सुरू झाल्यापासून माधुरीचे एपिसोडमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशताच आता एका एपिसोडमधील व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ती स्पर्धकाबरोबर गमतीशीर संवाद साधताना दिसत आहे.
माधुरी काय म्हणाली?
सोनी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी “संसारातल्या किश्शांनी मनोरंजन दुप्पट होणार… कारण आता खेळ बदलणार…” अशी कॅप्शन देण्यात दिली आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी “लोकांना असं वाटतं डान्स ज्यांना करता येतो त्यांना नवऱ्याला तालावर नाचवणं सोप जातं” असं म्हणते. त्यावर तिथे उपस्थित स्पर्धक महिलेचे पती दुरून ‘हो’ असं उत्तर देतात ज्यानतंर माधुरीलाही हसु आवरत नाही. त्यानंतर माधुरी त्यांनी “तुम्ही यांच्यासाठी आतापर्यंत केलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती?” असं विचारते. या प्रश्नावर ते “मी तिच्याशी लग्न केलं” असं म्हणतात ज्यानतंर तिथे हशा पिकतो
सध्या ‘कोण होणार करोडपती’मधील स्पर्धकांबरोबरचे माधुरीचे अनेक व्हिडीओ ज्यामध्ये ती तिच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सांगताना दिसतेय असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर येत्या भागात १७ ऑक्टोबरला ‘कोण होणार करोडपती’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम व अभिनेता आदिनाथ कोठारेही त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने हजेरी लावणार आहेत.
