Madhuri Dixit Kon Honar Crorepati : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दोन लोकप्रिय अभिनेत्रींची एन्ट्री होणार आहे. याशिवाय ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा मराठमोळा अंदाज सर्वांना पाहायला मिळेल. गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी, केसात माळलेलं मॅचिंग गुलाबाचं फूल, नाकात नथ, गळ्यात सुंदर नेकलेस अशा पारंपरिक अंदाजात माधुरीने करोडपतीच्या मंचावर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं.
दिवाळीच्या विशेष भागांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवीना टंडन या दोघी शोमध्ये सहभागी होणार आहेत. सोनालीची दिवाळीच्या सणानिमित्त मंचावर ग्रँड एन्ट्री झाली. यावेळी माधुरीने ढोल वाजवला. सोनाली अन् माधुरीने मिळून फुगड्या घातल्या आणि बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या.
सोनालीला अमेरिकेतील दिवाळी साजरा करताना किस्सा सांगत माधुरी म्हणाली, “आम्ही जेव्हा डेन्वरला राहत होतो, तेव्हा मी सुद्धा मुलांसाठी फटाके घेऊन यायचे. पण, तिथले फटाके कसे असायचे…एक लडी लावली की, असे थोडे पिक-पिक करायचे आणि मग संपायचे.” म्हणजेच त्या फटक्यांमध्ये इथल्यासारखी मजा नव्हती असं माधुरीला सांगायचं होतं. यावर सोनाली तिला म्हणाली, “अरे आमचे लक्ष्मीबॉम्ब तुझ्या फोटोंनी सजलेले होते.” यानंतर या दोघी खळखळून हसल्या.
तर, माधुरीने रवीनाला दिवाळीला तुमच्या घरी कोणकोणते गोड पदार्थ बनवले जातात याबद्दल विचारलं. यावर ती म्हणाली, “आमच्याकडे सगळे गोड पदार्थ असतात. म्हणजे इतके गोड पदार्थ बनवले जातात की, लहानपणी माझे बाबा म्हणायचे तुझं लग्न आम्ही हलवाईबरोबर लावून देतो.”
रवीना टंडन आणि सोनाली कुलकर्णीच्या खास दिवाळीच्या आठवणींनी करोडपतीचा संपूर्ण मंच सजणार आहे. लवकरच हे दोन्ही एपिसोड प्रसारित केले जातील. प्रेक्षकही या रवीना आणि सोनाली यांना करोडपतीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा शो सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो.
