अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये खास सेलिब्रेशन करण्यात येत आहे. या खास भागात ‘कोण होणार करोडपती’ची सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित स्पर्धक म्हणून सहभागी झाली. यावेळी माधुरीने ‘देवदास’मधील पारोच्या भूमिकेची झलक दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.शोच्या नव्या प्रोमोमध्ये गाणं सुरू असताना माधुरी अगदी सहजपणे पारोसारखे हावभाव देताना दिसत आहेत. तिचा हा अंदाज पाहून अमिताभ बच्चनही प्रभावित झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.

माधुरी दीक्षितने जिंकलं अमिताभ बच्चन यांचं मन

प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन कॉम्प्युटरला माधुरी दीक्षित यांच्यासाठी एक गाणं वाजवण्यास सांगताना दिसतात. गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत माधुरी ‘देवदास’मधील ‘काहे छेड मोहे’ या गाण्यावर बसूनच सादरीकरण करताना दिसते. माधुरीचा हा अंदाज पाहून अमिताभ बच्चन प्रभावित झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ते तिचं खूप कौतुकही करतात. यावेळी प्रेक्षकही माधुरीला दादा देतात. माधुरी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असताना अमिताभ टाळ्या वाजवत म्हणतात, “वाह वाह खूप अप्रतिम माधुरी जी.”

प्रोमो शेअर करताना सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने कॅप्शनमध्ये लिहिलं, “माधुरीचा अंदाज, सगळ्यांसाठी खास. ‘कौन बनेगा करोडपती’ पाहा, सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी LIV वर.” प्रोमो पाहिल्यानंतर चाहतेही अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच माधुरीच्या या अंदाजाने प्रभावित झाले आहेत. व्हिडीओच्याखाली माधुरीच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं खूप कौतुक केलं आहे. या प्रोमोखाली अभिनेत्री अमृता खानविलकरनेही “क्वीन” अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने ती “एक रानी आहे”, दुसऱ्याने “या एपिसोडसाठी खूप उत्सुक आहे”, “अजून एका चाहत्याने माधुरी मॅम तुम्ही खूप अप्रतिम नृत्यांगा आहात तुमची अदाकारी खूप कमाल आहे” अशा कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान,माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच ती ‘कोण होणार करोडपती’चं होस्टिंग करणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून हा शो सुरू होणार असून. अलीकडेच केबीसी मराठीचा पहिला प्रोमो समोर आला. त्यामुळे आता माधुरीला मराठी कार्यक्रमात तेही रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, येत्या ११ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माधुरीने ‘कौन बनेगा करोडपती’च्या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवस स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली.