‘कोण होणार करोडपती’च्या दिवाळी विशेष भागात माधुरीसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहे. हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींना एकाच मंचावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. माधुरी आणि सोनाली या दोघींनीही दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केलेलं आहे. “नाना सरांचं आज आपल्यात नसणं, हे खरंच वाटत नाहीये. ही त्यांच्याशिवाय पहिली दिवाळी…” असं सांगत असताना सोनाली यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
तर, माधुरी दीक्षितने यावेळी ‘प्रहार’ चित्रपटाची खास आठवण सांगितली. हा सिनेमा १९९१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘प्रहार’च्या दिग्दर्शनाची धुरा नाना पाटेकरांनी सांभाळली होती. तर, यामध्ये नानांसह माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया या अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नानांनी माधुरीला ‘मेकअप करू नकोस’ असं सांगितलं होतं. हीच आठवण तिने करोडपतीच्या मंचावर सांगितली आहे.
माधुरी आठवण सांगत म्हणाली, “मी त्याच्याबरोबर ‘प्रहार’ सिनेमा केला होता आणि त्यावेळी नाना म्हणाला, ‘मेकअप नकोय मला…’ त्यामुळे मी दुसऱ्यादिवशी फक्त तोंड धुवून सेटवर गेले होते. त्याने मला विचारलं मेकअप केलास ना? मी म्हणाले, ‘नाही नाना…’ तो म्हणाला दाखव मला. मग एक मेकअप रिमुव्हर आणलं आणि मी चेहरा पुसून त्याला दाखवला. म्हटलं बघ आहे का मेकअप? तर म्हणतो, हा आता बरोबर आहे.” नानांची ही आठवण ऐकताच सोनालीचे डोळे भरून आले होते.
दरम्यान, ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.
