अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा विवाहसोहळा १९९९ मध्ये अमेरिकेत पार पडला होता. ९० च्या दशकात माधुरीची प्रचंड क्रेझ होती, त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यावर अनेकांचे हार्टब्रेक झाले होते. माधुरीचा विवाहसोहळा अमेरिकेत तिच्या भावाच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पार पडला होता. त्यावेळी तिने लग्नाबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. नुकताच ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये सोनाली बेंद्रेसमोर माधुरीने हा किस्सा सांगितला आहे.

सोनालीने तिला विचारलं, “तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा जगभरातील अनेक लोकांचे हार्टब्रेक झाले. तेव्हा सोशल मीडियाची वगैरे काहीच क्रेझही नव्हती. त्यामुळे तुमचं लग्न कसं झालं याबाबत कोणाला काहीच माहिती नाहीये. तर, त्याबद्दल काय सांगाल?”

माधुरी यावर म्हणते, “तू म्हणतेस ना सर्वांचे हार्टब्रेक झाले…म्हणून मी अशा माणसाशी लग्न केलं जो सर्वांच्या हृदयावर उपचार करतो. राम ‘हार्ट सर्जन’ आहेत आणि आमची ओळख माझ्या भावाच्या घरी अमेरिकेत झाली. माझ्या भावाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि तिथे राम आला होता. तेव्हा माझ्या मनात काहीच नव्हतं…पण, माझ्या भावाचा उद्देश लग्न ठरवणं हाच होता. जर, त्याने मला आधीच सांगितलं असतं तर, मी कदाचित लग्नासाठी तयार झाले नसते. कारण, जेव्हा तो विचारायचा… ‘तो कसा वाटतोय, हा कसा वाटतो…तेव्हा मी बोलायचे, मी मला जेव्हा कुणी मनापासून आवडेल तेव्हा तुला सांगेन.’ रामला भेटून एक वेगळाच अनुभव आला कारण, तो मला ओळखतच नव्हता. त्याला मी अभिनेत्री आहे हे माहितीच नव्हतं. एवढ्या चित्रपटांमध्ये काम केलंय वगैरे काहीच माहिती नव्हतं.”

ती पुढे म्हणाली, “रामला मराठी यायचं पण, हिंदी समजायचं नाही. तो कधीच हिंदी बोलला नव्हता. त्याने कधीही हिंदी सिनेमे पाहिले नव्हते. त्याला एकच हिंदी सिनेमा माहिती होता ‘अमर अकबर अँथनी’. आमचं लग्न झालं आणि जेव्हा रिसेप्शन होतं…तेव्हा रामने फक्त अमिताभजींना ओळखलं होतं. त्याच्या डोक्यात माझ्याबद्दल काहीच इमेज नव्हती. मला त्याने माणूस म्हणून समजून घेतलं. इथे भारतात आल्यावर त्याला माझं स्टारडम वगैरे समजलं.”

…म्हणून गुपचूप लग्न केलं!

“त्यावेळी मीडिया दरवर्षी माझ्या लग्नाच्या बातम्या छापायची. नाव वगैरे देऊन माधुरीचं लग्न झालं अशा बातम्या यायच्या. म्हणून मी ठरवलं होतं की, ज्यादिवशी मी लग्न करेन तेव्हा कोणालाच समजलं नाही पाहिजे की, माझं लग्न झालंय. अमेरिकेत माझ्या भावाच्या घरी माझं लग्न झालं. म्हणूनच माझ्या लग्नाबद्दल फार कोणाला माहिती नाहीये. तेव्हा मी माझ्या आजीची नऊवारी साडी नेसली होती आणि लग्नासाठी मी स्वत:च तयारी केली होती.नऊवारी साडीही स्वत:च नेसली होती.” असं माधुरी दीक्षितने सांगितलं.