Kanwarjit Paintal Video : सोशल मीडियावर फॉलोअर्स नसणे आणि फॉलोअर्स नसल्याने काम न मिळणे अशा चर्चा कलाकारांकडून अगदी सर्रास होताना दिसतात. उत्तम अभिनय कौशल्य असूनही केवळ सोशल मीडियावर फोलअर्स नाहीत म्हणून अनेकांना अभिनयाची कामे गमवावी लागली आहेत. अनेक कलाकारांनी त्यांचे हे अनुभव शेअर केले आहेत.

आताच्या नवीन पिढीच्या कलाकारांना हा अनुभव येतोय असं नाही, तर काही ज्येष्ठ कलाकारांनासुद्धा या सोशल मीडिया फॉलोअर्समुळे काम मिळत नसल्याचा अनुभव येत आहे. ज्येष्ठ अभिनेते पेंटल यांनी फॉलोअर्स नसल्याने काम मिळत नसल्याचा अनुभव नुकताच शेअर केला.

ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ते आता ७७ वर्षांचे आहेत. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘शिखंडी’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दांडगा अनुभव असूनही आज त्यांना कामासाठी संघर्ष करावा लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स कमी असणे.

सोशल मीडिया फॉलोअर्स नसल्याने काम मिळत नसल्याचा एक व्हिडीओ त्यांचा व्हायरल होत आहे. अभिनेते मनमीत सिंह यांनी त्यांचा हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मनमीत पेंटल यांना विचारतात, “सर, तुम्ही अभिनेते आहात का?” त्यावर कंवरजीत पेंटल उत्तर देतात, “नाही, माझे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नाहीत, त्यामुळे मी अभिनेता नाही.” त्यानंतर मनमीत म्हणतात, “म्हणजे आता मला फॉलोअर्स वाढवावे लागतील? सर, ज्याचे फॉलोअर्स नसतात, तो अभिनेता नसतो का?” त्यावर पेंटल म्हणतात, “नाही, मुळीच नाही.” शेवटी मनमीत उपहासाने म्हणतात, “मला माफ करा, फॉलोअर्स वाढवा, अभिनय करण्याची काहीच गरज नाही.”

हा व्हिडिओ शेअर करत मनमीत सिंह यांनी लिहिले आहे की, “आजकालच्या कलाकारांना या कटू सत्याचा सामना करावा लागत आहे. अनुभव आणि टॅलेंटला महत्त्व दिले जात नाही, फक्त इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या पाहिली जाते.” दरम्यान, कंवरजीत पेंटल यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कंवरजीत पेंटल यांचा व्हिडीओ

मराठी अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे म्हणते, “पेंटल सर, तुम्हाला सोशल मीडिया फॉलोअर्सची मुळीच गरज नाही. तुमचे काम या सगळ्याच्या पलीकडे आहे. तर अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊतने हसण्याच्या इमोजीसह “एकदम बरोबर बोललात सर! हे फक्त तुम्हीच करू शकता”, असं म्हटलं आहे.

मराठी अभिनेत्रींच्या कमेंट्स

marathi actress comments
शर्मिला शिंदे आणि शर्मिष्ठा राऊत कमेंट्स

कंवरजीत पेंटल यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘जवानी दिवाणी’, ‘रफू चक्कर’, ‘बावर्ची’, ‘पिया का घर’, ‘खोटे सिक्के’, ‘जंगल मे मंगल’, ‘हीरा पन्ना’, ‘रोटी’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.