Mahabharat Gandhari Renuka Israni Unmarried Reason: ८० च्या दशकात बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने इतिहास रचला होता. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी देवासारखं डोक्यावर घेतलं. या मालिकेत वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १०० मुलांची आई म्हणजेच ‘गांधारी’ची आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रेणुका इसरानी (Renuka Israni) गेल्या १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणे दूर आहे. ५९ वर्षांची रेणुका अजूनही अविवाहित असून ती मुंबईत एकटीच आयुष्य जगत आहे.

रेणुका इसरानीचं बालपण राजस्थानमधील जयपूरमध्ये गेलं. तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण ती अभिनेत्री झाली. रेणुकाने जयपूरच्या ‘महारानी कॉलेज’मधून शिक्षण पूर्ण केलं. पदवी पूर्ण केल्यावर ती दिल्लीला आली आणि तिने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) मध्ये प्रवेश घेतला. याच दरम्यान तिला ‘हम लोग’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, जी दूरदर्शनवरील देशातील पहिली टीव्ही मालिका होती.

या मालिकांमध्ये केलं काम, ‘गांधारी’च्या भूमिकेने मिळाली लोकप्रियता

‘हम लोग’ या मालिकेनंतर रेणुका इसरानीने ‘कभी तो मिलोगे’, ‘केसरिया बालम आवो हमारे देस’, ‘देवी’, ‘घराना’ आणि ‘बड़े अच्छे लगते हैं’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. पण १९८८ मधील बी.आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेतील गांधारीच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.

वयाच्या २२ व्या वर्षी केली १०० मुलांच्या आईची भूमिका

गांधारीची भूमिका साकारणं रेणुका इसरानीसाठी आव्हानात्मक होतं. कारण त्यावेळी तिचं वय फक्त २२ वर्षे होतं आणि तिला १०० मुलांच्या आईची भूमिका करायची होती. तसेच, त्यांना संपूर्ण शूटिंग दरम्यान डोळ्यांवर पट्टी बांधूनच राहावं लागायचं. डोळ्यांवरील याच पट्टीमुळे रेणुका इसरानीला गांधारीची भूमिका करताना सुरुवातीला खूप त्रास झाला होता.

२०११ मध्ये अभिनयाला रामराम, आई-वडिलांसाठी घेतला निर्णय

रेणुका इसरानीने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं होतं. करिअर चांगलं चाललं होतं, पण २०११ मध्ये तिने अभिनय सोडला. याचं कारण तिने २०१७ मध्ये ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. रेणुकाचे आई-वडील खूप वृद्ध झाले होते आणि त्यांना सतत कोणाच्या तरी आधाराची व काळजी घेण्याची गरज होती. तिचे वडील बोलू शकत नव्हते आणि त्यांना फक्त सांकेतिक भाषा समजायची, त्यामुळे आई-वडिलांच्या सेवेसाठी रेणुकाने अभिनय सोडला. पण काही वर्षांनंतर तिच्या आई-वडिलांचे निधन झाले आणि ती पूर्णपणे एकटी पडली.

आई-वडिलांना कधी एकटं सोडावं लागू नये, म्हणून रेणुकाने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या ५९ व्या वर्षीही ती अविवाहित आहे. रेणुका आता मुंबईतील लोखंडवाला परिसरात राहते. तिला कविता लिहायची आवड आहे. तसेच ती लेखिका देखील आहे.