टीव्ही मालिका ‘महाभारत’मध्ये ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते गुफी पेंटलची यांचं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. गुफी पेंटल यांच्या पार्थिवावर आज(५ जून) सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुफी पेंटल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती.




गुफी पेंटल यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफू चक्कर’ चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांचा मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चाहते व मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
महाभारत मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले गुफी पेंटल ‘अकबर बिरबल’, ‘सीआयडी’, ‘राधा कृष्णा’ या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. त्यांनी कास्टिंग दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘कन्हैया लाल’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.