Mahabharat TV Serial Stoppage Controversy : रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे मालिकाविश्वातील लोकप्रिय ऐतिहासिक मालिकांची चर्चा होत आहे. ८०च्या दशकामध्ये रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांचे ‘महाभारत’ यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही प्रेक्षक या मालिकांची आवर्जून आठवण काढतात. १९८८ मध्ये टीव्हीवर प्रसारित होण्याआधी ‘महाभारत’ मालिका जवळपास चार वर्षे अडकली होती. प्रोमो रिलीज झाल्यानंतर मालिकेतील काही भागांवर राजकीय व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. यामुळे न्यायालयामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मालिकेसंबंधित सुनावणी पार पडली होती.
‘महाभारत’ मालिकेमध्ये युधिष्ठिरची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी ‘हिंदी रशला’ दिलेल्या मुलाखतीत काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, खरंतर १९८४ पासून निर्मात्यांनी मालिकेची जाहिरात देण्यास सुरुवात केली होती, पण चार वर्षे ही मालिका अडकली. प्रत्यक्षात १९८८ मध्ये ‘महाभारत’च्या शूटिंगला सुरुवात झाली. २ ऑक्टोबर १९८८ रोजी पहिला भाग प्रसारित होणार होता. पण, काही राजकारण्यांनी मालिकेतील संवाद आणि काही गोष्टींवर आक्षेप घेतला, त्यामुळे प्रसारणाच्या एक दिवस आधी १ ऑक्टोबरला मालिकेच्या प्रसारणावर स्थगिती आणली होती.
राज बब्बर यांच्या ‘या’ डायलॉगवर घेतलेला आक्षेप
पुढे गजेंद्र चौहान म्हणाले, “‘महाभारत’ मालिकेचा प्रिव्ह्यू पाहून दिल्लीतील काही राजकारण्यांनी त्यातील काही संवादांवर आक्षेप घेतला होता. मालिका प्रसारित होण्याच्या एक दिवस आधी राजकारणी व्यक्तींनी दोन गोष्टींवर आक्षेप घेतला. पहिली गोष्ट म्हणजे, राजा भरतची भूमिका साकारणाऱ्या राज बब्बर यांचा एक डायलॉग होता, ‘राजाची निवड जन्माने नव्हे, तर गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे.’ या संवादामुळे कोणाला तरी वाईट वाटलं होतं. त्या व्यक्तीने ही मालिका प्रसारित करू नये असा आदेश दिला. १ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यावर स्थगिती आणली. प्रत्येक वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आणि वर्तमानपत्रांमध्ये छापून आली.”
उशीरा पार पडली होती सुनावणी
पुढे ते म्हणाले, “मालिका प्रसारित होण्यापूर्वी स्थगिती येताच बी. आर. चोप्रांनी एका रात्रीत तातडीने न्यायालयीन सुनावणीची व्यवस्था केली. त्यावेळी बी. आर. चोप्रांनी स्थगिती उठवली जाईल याची खात्री केली. पण, तोपर्यंत दुसऱ्या दिवसाची वर्तमानपत्रं छापून झाली होती, त्यामुळे गैरसमज झाला आणि लोकांना वाटलं की ‘महाभारत’ प्रसारित होणार नाही. पण, न्यायालयीन सुनावणीमध्ये बी. आर. चोप्रांनी मालिकेवरील स्थगिती उठवली. पण, या घडामोडीचा पहिल्या एपिसोडवर परिणाम झाला आणि खूप कमी टीआरपी मिळाला.”
गजेंद्र चौहान साकारणार होते श्रीकृष्ण
गजेंद्र चौहान म्हणाले, “महाभारत मालिकेच्या प्रसारणाला आणि शूटिंगला उशीर झाला होता, पण तरीही नंतर ‘महाभारत’ने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली की आजही या मालिकेची चर्चा होते. त्या काळात अनेक घरांमध्ये एकच टीव्ही असल्याने संपूर्ण गाव एकत्र येऊन मालिका पाहायचे. या मालिकेमध्ये मी आधी श्रीकृष्णाची भूमिका करणार होतो, पण नंतर मला बलरामाची भूमिका मिळाली व शेवटी मला युधिष्ठिरची भूमिका देण्यात आली. यावरून खरंतर मी नाराज होतो, पण त्यावेळी आमचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी माझी समजूत काढली.”
