Marathi Actress Shares Old Memory Of Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल (२८ जानेवारी) रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. आज (२९ जानेवारी) अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
अजित पवार यांच्या निधनाबद्दल कळताच अनेक कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या. केवळ राजकारणच नव्हे; तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीसुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली. बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे भावुक पोस्ट शेअर केल्या होत्या. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने अजित पवार यांच्या आठवणीत एक जुनी आठवण सांगितली आहे.
‘अजित पवार गेले’, हे ऐकल्यावर आम्हाला…
हेमांगीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “काल (२८ जानेवारी) सकाळी मी नेहमीप्रमाणे शूटिंगला गेले. मेकअप करून, तयार होऊन स्क्रिप्ट वाचनाला आम्ही सगळे जमलो. सीन वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. त्यांच्या आईंचा फोन होता. आमचे दिग्दर्शक म्हणाले “मी ब्रेकफास्ट केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने” आणि हसत हसत आमच्यासमोरच कॉल घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले “काय?” आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हाला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून सोशल मीडिया पाहू लागलो. कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झाला असेल? ‘फेक न्यूज’ असेल, पण सगळ्या सोशल मीडियावर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या. धक्कादायक म्हणजे काय हे काल (२८ जानेवारी) पुन्हा प्रकर्षाने जाणवलं आणि ज्याप्रकारे मृत्यू झालाय ते तर आणखी भीषण आहे. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट प्रोसेस झालेलं नाहीये.”
हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर…
यानंतर हेमांगीनं तिचा अजित पवारांबरोबरची आठवण शेअर केली आहे. तिने म्हटलं, “१० वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांबरोबर इतरही नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हां कलाकारांना ग्रुप फोटोसाठी स्टेजवर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे प्रोटोकॉल सांभाळून फोटो काढले जात होते. पण स्टेजवर ही गर्दी झाली. ग्रुप फोटोमध्ये सगळे नीट मावावेत, म्हणून आम्ही सगळे कलाकार फोटोसाठी लाइनमध्ये पुढे उभे राहिलो. तेवढ्यात मागून आवाज आला “काय कवी”. मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं, तर माझ्या अगदी मागे दादा (अजित पवार) उभे होते. मी दचकून म्हणाले “सर तुम्ही?” मी त्यांना “तुम्हाला माझं नाव कसं माहीत?” हे विचारणार तेवढ्यात तेच म्हणाले “आडनाव कवी आहे; तर काय कविता-बविता करता की नाही?” यावर हसून “मी फक्त नावाची कवी आहे” म्हटलं. त्यावर त्यांनी विचारलं “आडनाव कवी कसं काय” मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं. बरं समोर फोटो काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं “तुम्ही पुण्याच्या का?” मी ‘नाही’ बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… “अरे त्या ‘माण’ तालुक्याच्या आहेत… जयकुमार गोरेच्या गावच्या”. हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी फोटो काढायचं सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानशी स्माईल देत सगळ्यांबरोबर फोटो काढत होते. फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हां सगळ्यांना त्यांच्या विशेष स्टाइलमध्ये उजव्या मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं नमस्कार करत ‘चला’ म्हणत निघून गेले.”
सामान्य माणसाशी कनेक्ट असलेला दादा…
यानंतर हेमांगीनं म्हटलंय, “घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली. मी म्हटलं एवढा मोठा, व्यस्त माणूस माझ्या सारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो, पप्पा? मी कुठली याची माहिती ही त्यांना कशी माहीत? त्यावर बाबा म्हणाले “चांगला नेता कायम तळागळ्यातल्या लोकांशी हा असा आपला ‘कनेक्ट’ ठेवतो. त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखेच ते आहेत मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण. उगाच नाही ते उपमुख्यमंत्री आहेत!” त्यानंतर अजितदादा मला अगदी ४-५ वेळाच भेटले पण प्रत्येक वेळी त्यांच्या मिश्किल स्माईलने “काय कवी” म्हणून हाक मारली. काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते “काय कवी” माझ्या कानात घुमत आहे. सामान्य माणसाशी सहज कनेक्ट असलेला नेता, माणूस, दादा गेला! Not Done दादा, Not Done!”
दरम्यान, हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच तिच्या पोस्टखाली अनेकांनी दु:खही व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी अजित पवारांना श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केली आहे.

