‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. यामधील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना आपलासा वाटतो. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. परदेशातील प्रेक्षकांना सुद्धा या कार्यक्रमाची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौऱ्यावर जाऊन तेथील प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. गेल्यावर्षी ही संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर गेली होती. आता यंदाच्या वर्षी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे हे विनोदवीर ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली असून याठिकाणी सिडनी, मेलबर्न अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये हे कलाकार लाइव्ह परफॉर्म करणार आहेत. विनोदवीरांसह या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. याठिकाणी या संपूर्ण टीमने मिळून एका ट्रेडिंग गाण्यावर जबदस्त डान्स केला. याचा खास व्हिडीओ प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : काजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी प्राजक्तासह पृथ्वीक प्रताप, सचिन मोटे, समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, चेतना भट या सगळ्या कलाकारांनी मिळून “कुडिये नी…” या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला.

हेही वाचा : “तुमची मुलगी असती तर?” कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की झाल्याने ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु संतापली, म्हणाली…

“आम्ही ऑस्ट्रेलियात एकत्र अशी मजा करतोय…सचिन मोटे सर सुद्धा सामील झाले, याचा विशेष आनंद!” असं कॅप्शन प्राजक्ता माळीने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, हास्यजत्रेच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर, अश्विनी कासार, सलील कुलकर्णी यांनी कमेंट करत या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.