Marathi Actor Nikhil Bane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता निखिल बने गौरी-गणपतीच्या आणि शिमग्याच्या सणाला दरवर्षी न चुकता गावी जातो. हे दोन्ही सण कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे गणेशोत्सव आणि होळीला चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सुद्धा मूळचे कोकणातले आहेत. सणासुदीला किंवा व्यग्र शेड्युलमधून वेळ मिळाल्यावर हे कलाकार आवर्जून कोकणात जातात. निखिल बनेने यापूर्वी सुद्धा अनेकदा आपल्या गावची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यामुळे यंदाही निखिल गणेशोत्सवाची व्हिडीओ केव्हा शेअर करतोय, याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
निखिल बने चिपळूण येथील कापरे गावचा आहे. यंदा तो चिपळूणपर्यंत कोकण रेल्वेने आणि तिथून लालपरीचा प्रवास करून आपल्या गावी पोहोचला होता. याची झलकही अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे, सध्या इन्स्टाग्रामवर कोणत्याही व्हिडीओला ट्रेंडिंग गाणं लावून, मग तो व्हिडीओ शेअर करायचा असा एकंदर ट्रेंड सुरू आहे. पण, निखिलने यापलीकडे जाऊन गावचा गणेशोत्सव जशास तसा Original Audio मध्ये चाहत्यांना दाखवला आहे. त्याने एकाही क्लिपचा ओरिजिनल आवाज म्युट केलेला नाही.
गावच्या रस्त्यावरून धावणारी लालपरी, अंगणातील पक्ष्यांचा आवाज, गणपतीची आरती, रात्री होणारं भजन, कोकणातील पारंपरिक विसर्जन, गावची भातशेती, गौरी आगमन, विसर्जनाची खास आरती याची झलक निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “कधीही न विसरता येणारे क्षण” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
निखिलने या व्हिडीओच्या शेवटी देखील एक सुंदर कॅप्शन लिहिलंय. “हे व्हिडीओ Original Audio मध्ये शेअर केल्याने अनेक ठिकाणी क्लिप्समध्ये तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. पण, तुम्ही कोकणातले असाल…तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहूनच यामागची भावना जरूर कळेल.”
दरम्यान, चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जणू स्वर्गीय सोहळा”, “आयुष्यातले सुखाचे दिवस”, “हीच खासियत आहे कोकणातल्या गणेशोत्सवाची.. दादा तू व्हिडिओ मध्ये काही बोलला नाहीस”, “गाणंही नव्हतं आणि आम्ही न ऐकता सगळं अनुभवलं”, “भारी व्हिडीओ”, “हाच खरा गणेशोत्सव” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
