‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला घराघरांत ओळख मिळाली. गेल्या काही वर्षांत तिने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. ‘ती फुलराणी’ ते ऑस्करपर्यंत पोहोचलेला ‘दशावतार’ अशा एकापेक्षा दमदार सिनेमांमध्ये प्रियदर्शिनीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच अभिनेत्रीच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे.

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘युवागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल तिला हा ‘युवागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते मंगळवारी प्रियदर्शिनीला हा पुरस्कार मिळाला. महत्त्वाचं म्हणजे याच विद्यापीठातून प्रियदर्शिनीने इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. हा पुरस्कार मिळाल्यावर अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रियदर्शिनी लिहिते, “आपल्या पालकांना आपला अभिमान वाटणं यापेक्षा दुसरं समाधान नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कलाक्षेत्रातील ‘युवागौरव पुरस्कार २०२६’….मुळात ज्या विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली, त्या विद्यापीठाकडून मला कलाक्षेत्रासाठी पुरस्कार मिळतोय हे मजेशीर आहे. Seniors पासून, समवयीन कलाकारांपर्यंत, अनेकांच्या सहवासात मी घडले. अनेकांनी दिशा दाखवली, पण तरी, काही नावं या प्रवासात ठळक आहेत. प्रवीण भोळे, सतीश आळेकर, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रकाश पारखी, विश्वास जोशी या सगळ्यांचे मनापासून आभार…”

प्रियदर्शिनी ‘पुणे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याहून जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला आहे. रंगमंचावर मी भावुक झाले होते…मला इंजिनीअरिंगची सगळी वर्ष आठवली. हा पुरस्कार मिळणं भाग्याची गोष्ट आहे.” अभिनेत्रीने तिच्या वडिलांसह खास फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या पोस्टवर सलील कुलकर्णी, वनिता खरात, स्पृहा जोशी, अभिषेक रहाळकर, आरती मोरे, पल्लवी पाटील यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.