भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या लाडक्या हिटमॅनची एक लहानशी झलक पाहण्यासाठी चाहते कायम आतुर असतात. रोहितने आजवर अनेक महत्त्वाच्या खेळांमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केलेली आहे. सामान्य लोकांप्रमाणे मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार सुद्धा रोहितचे फॅन्स आहेत.

काही लोकप्रिय मराठी कलाकारांनी नुकतीच रोहित शर्माची भेट घेतली. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मराठी रंगभूमीवर काही महिन्यांपूर्वीच ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सगळ्यांनी मिळून नुकतीच रोहित शर्माची भेट घेतली.

‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाची टीम नुकतीच रोहित शर्माला भेटली आणि महत्त्वाचं म्हणजे या टीमशी हिटमॅनने मराठीत संवाद साधला. प्रसाद खांडेकरने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये रोहित शर्माने आमच्याशी मराठीत संवाद साधल्याचं प्रसादने म्हटलं आहे. “मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे” असं यावेळी रोहित नम्रता संभेरावला म्हणाला.

प्रसाद खांडेकरची पोस्ट

थेट तुमच्या घरातून टीमची ग्रेट भेट With One and Only रोहित शर्मा!
रोहित – अरे नमस्कार नमस्कार! काढूया ना फोटो या-या…
नम्रता- खूप भारी वाटतंय तुम्ही मराठी बोलताय…
रोहित – अरे मुंबईत राहतो मी… मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे.
खूप भारी आहे आमचा मराठमोळा रोहित भाय

मनःपूर्वक धन्यवाद या कायम लक्षात राहणाऱ्या दिवसाबद्दल… अजय देसाई सर, किशोर लाड सर आणि आमची लाडकी वर्षा हडकर.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलं आहे. दीपक कदम आणि संध्या कदम हे मध्यमवर्गीय जोडपं. राहुल आणि श्रुती ही त्यांची मुलं. या कुटुंबावर आधारित हे नाटक आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शोज देखील हाऊसफुल सुरू आहेत.