Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा चाहतावर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत पोहोचले. प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, ओंकार राऊत, निखिल बने, रोहित माने, वनिता खरात या कलाकारांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. एकंदर या शोमुळे बऱ्याच कलाकारांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. म्हणूनच कलाकारांसह प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला आपलंसं करून घेतलंय. नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये हास्यजत्रेची संपूर्ण टीम सेटवर एकत्र सेलिब्रेशन करताना दिसतेय. यामागचं कारण जाणून घेऊयात…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम ऑगस्ट २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कॉमेडी शोला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने हास्यजत्रेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या सगळ्यांनी मिळून सेटवर केक सुद्धा कापला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सचिन गोस्वामी लिहितात, “२०१८ ला आजच्या दिवशी ‘सोनी मराठी’ वाहिनीचा प्रवास सुरू झाला होता आणि या प्रवासात हास्यजत्राही सोबत आहे. हास्यजत्रेची ही ८ वर्षे पूर्ण होण्यात संपूर्ण सोनी टीम, वेटक्लाउड टीम यांचंही श्रेय आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार…असंच प्रेम कायम ठेवा. अजय भालवणकर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्धगुरु, अरविंद कोप्पली, गौरव बॅनर्जी आणि सोनी मराठीची टीम सगळ्यांचे खूप आभार!”
नेटकऱ्यांनी सचिन गोस्वामी यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सर तुमच्या टीमला मनापासून शुभेच्छा”, “हा शो माझ्या सुख-दुःखाचा अविभाज्य साथीदार आहे”, “तुम्ही सर्व खूप छान आहात”, “धन्यवाद गेली ८ वर्षे आमचं निखळ मनोरंजन केल्याबद्दल”, “दोन्ही सरांना याचं क्रेडिट जातं”, “वाह वाह खूप अभिनंदन” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो. यामध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, ईशा डे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, चेतना भट, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, अरुण कदम अशा बऱ्याच कलाकारांची मांदियाळी आहे. याशिवाय सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा हास्यजत्रेचा महत्त्वाचा भाग आहे.
