आपल्या लाडक्या कलाकारांची लाइफस्टाइल जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. इतकंच नव्हे तर काही कलाकार मंडळीही आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. कलाकारांच्या महागड्या घरांची तर नेहमीच चर्चा रंगताना दिसते. पण अजूनही कित्येक कलाकार भाड्याच्या घरात राहतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
‘संपूर्ण स्वराज’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकला त्याच्या खासगी आयुष्यातील खर्चांविषयी विचारण्यात आलं. यावेळी त्याने त्याच्या खर्चाचं संपूर्ण गणितंच मांडलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी त्याला किती मानधन मिळतं? हेही त्याने सांगितलं. शिवाय दर महिन्याला घराचं किती भाडं भरतो? याचाही खुलासा पृथ्वीकने केला.
पृथ्वीकला दर महिन्याला किती पैसे मिळतात? त्याचा वापर तो नेमका कसा करतो? याविषयी त्याने भाष्य केलं. तो म्हणाला, “मला महिन्याला ६० हजार रुपये मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, १० हजार रुपये एसआयपी, १० हजार रुपये इन्शुरन्स यात ४० हजार जातात”.
“उरलेल्या पैशांत मी माझं आयुष्य जगतो. उरलेल्या २० हजार रुपयात मेडिकल, भाजीचा खर्च सगळं निघतं. बाकी गोष्टीत मला दादा-वहिनीची मदत होते”. त्याशिवाय कलाक्षेत्रात ज्युनिअर आर्टिस्टना दिवसाला फक्त ८०० रुपये मिळतात असंही पृथ्वीक म्हणाला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे पृथ्वीकच्या चाहत्यावर्गामध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय त्याच्या अभिनयाचेही आता हजारो चाहते आहेत.