Maharashtrachi Hasyajatra director Sachin Goswami Post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गेली ८ वर्षे हा शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या शोच्या अनेक क्लिप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत असतात. अशाच काही व्हायरल क्लिप्सबद्दल शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट केली आहे. ‘विकृतीचा कळस’ असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सचिन गोस्वामी नेमके का संतापले, ते जाणून घेऊयात.

सचिन गोस्वामींनी पोस्टमध्ये लिहिलं, “विकृतीचा कळस…महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली ८ वर्षे सोनी मराठी वाहिनीवर सादर होत आहे. १००० भाग पूर्ण होत आहे आणि जगभरातील मराठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रिय आहे. हल्ली हास्यजत्रेचे अनेक भाग सोनी मराठीच्या ऑफिशअल चॅनेलवर आणि पोर्टलवर तर दिसतातच पण इतर यूट्यूब पोर्टल्स ही दाखवतात. ही युट्यूब चॅनेल्स अधिकृत आणि अनधिकृत पद्धतीने प्रसारित करतायेत आणि पैसे ही कमावत आहेत. पण या सर्व भागांचे प्रसारण करताना अत्यंत अश्लील थंबनेल आणि कॅप्शन टाकून कार्यक्रमाची बदनामी करत आहेत.”

sachin goswami post
सचिन गोस्वामींची पोस्ट (सौजन्य फेसबूक)

“ज्या कंटेंटवर आपण आपले पोट भरत आहेत, त्यावर असे बदनामी कारक थंबनेल आणि कॅप्शन करताना थोडी ही लाज वाटत नसावी का? अत्यंत क्लेशदायक आहे हे. कृपया प्रेक्षकांनी या प्रकारामुळे कार्यक्रमाच्या दर्जा विषयी शंका घेवू नये आम्ही दर्जा राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. संबंधितांनी हे प्रकार त्वरित थांबवावे आणि कुणास असे आक्षेपार्ह फोटो किंवा कॅप्शन दिसल्यास त्या व्हिडीओस रिपोर्ट करावे,” अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर केली आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट्ट, ईशा डे, पृथ्विक प्रताप, श्याम राजपूत, अरुण कदम, प्रभाकर मोरे, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, निमिष कुलकर्णी, ओंकार राऊत अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या विषयांवर आधारित विनोदी स्किट्स सादर करतात. दैनंदिन जीवन, कौटुंबिक प्रसंग, राजकारण, बॉलीवूड आणि सामाजिक विषयांवर स्किट या शोमध्ये पाहायला मिळतात.