बिहारच्या जमुई जिल्ह्यात अलीकडेच एक धक्कादायक प्रकार घडला. कोचिंग क्लासवरून बाईकवर परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला जमावाने घेराव घातला. या दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर रस्ता अडवून त्यांच्याशी असभ्य वर्तन, विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, जमुईतील स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात पीडित मुलीलाच दोषी ठरवलं.

“दहावीत शिकणारी मुलगी संध्याकाळी ७ वाजता तिच्या मित्रासोबत बाहेर काय करत होती?” असे प्रश्न काही स्थानिकांकडून प्रसारमाध्यमांवर उपस्थित करण्यात आले. पीडितेलाच दोषी ठरवणाऱ्या या स्थानिक नागरिकांचा विशेषत: महिलांचा व्हिडीओ झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे.

सचिन गोस्वामी लिहितात, “जमुई प्रकरणात त्या विकृत मुलांची जेवढी घृणा आली त्याही पेक्षा जास्त काळजी तिथल्या काही महिलांचं आरोपीच्या वर्तनाला योग्य ठरवणं आणि ही मुलगी रात्री तिथं गेलीच कशाला? असं म्हणणं हे जास्त चिंताजनक वाटलं. महिलाच स्वातंत्र्य आणि आपल्या सन्मानाबद्दल उदासीन असतील तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत याचा विचार करावा लागेल…पुरुषी अधिपत्य पुरुषांनी लादणं हे अन्यायकारक आहेच पण त्याहूनही अधिक भयंकर, स्त्रियांनी स्वतः ते जोखड लादून घेणं आहे..खूप अस्वस्थ व्हायला होतंय.”

sachin goswami
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची पोस्ट

सचिन गोस्वामी नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत. “खरंच हे सगळं ऐकून अस्वस्थ झालोय”, “या मुलांमुळे एका आजोबांनी आपल्या नातीला शाळेत पाठवणं बंद केलं ते ऐकून इतका त्रास झाला…. एक भविष्य घडता घडता राहिलं”, “स्त्रीच स्रीचा शत्रू होणं हे दुर्दैव आहे”, “अगदी खरयं ..किती विकृत बनत चाललाय हा समाज” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी सुद्धा महिलांच्या सुरक्षेबाबत आणखी कठोर नियम व्हावेत आणि या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.