Maharashtrachi Hasyajatra Actor New Business : मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक कलाकारांनी अभिनय करण्याबरोबरच एक उद्योजक म्हणून नवी सुरुवात केली आहे. मराठी कलाविश्वातल्या अनेक कलाकारांनीसुद्धा नवा व्यवसाय सुरू केला आहे. कुणी स्वत:चं पार्लर सुरू केलं आहे, तर कुणी स्वत: साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. तर कुणी छोटेखानी हॉटेल सुरू केलं आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता दत्तू मोरे आता अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. त्याने अभिनयासह एक नवीन इनिंग सुरू केली आहे. दत्तूने ठाण्यात ‘डेली बाऊल’ या नावाने क्लाऊड किचन सुरू केले आहे. याबद्दलची पोस्ट एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामार्फत लोकांना पौष्टिक, संतुलित आणि घरगुती चवीचे हेल्दी फूड देण्याचा दत्तूचा प्रयत्न आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय, “फास्ट फूडच्या जमान्यात तेलकट, तुपकट, चमचमीत आपण खातो. त्यामुळे शरीराला योग्य पोषण आहार मिळत नाही. ऑफिसला जाणाऱ्या मंडळींचा प्रॉब्लम वेळेचा असतो, त्यामुळे सकस आहार त्यांना बनवता येत नाही आणि पर्यायाने खाता येत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करत दत्तूने हा व्यवसाय सुरु केलाय. तो आणि त्याचे वडील ठाण्यात हा व्यवसाय सुरु करतायेत.” या पोस्टवर दत्तूनेही प्रतिक्रिया व्यक्त करीत “धन्यवाद”, असं म्हटलंय.
दत्तूच्या या नव्या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. चाहत्यांनी त्याच्या या नव्या प्रयत्नासाठी आनंद व्यक्त केलं आहे. अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवल्याबद्दल दत्तूच्याचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. तसंच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दत्तू विविध प्रकारच्या विनोदी भूमिका साकारताना दिसतो. अगदी कुठल्याही भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. त्याच्या अनोख्या विनोदी शैलीचं कायमच कौतुक होतं. अशातच आता दत्तूने अभिनयासह व्यवसायात पदार्पण केल्यानेसुद्धा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

