Nikhil Bane Shares Shimga Video : कोकणी माणूस आणि शिमगा यांचं एक अतूट नातं आहे. कोकणात हा सण फक्त एका दिवसाचा नाही, तर होळीच्या आदल्या दिवसापासून गुढीपाडव्यापर्यंत तब्बल १०-१५ दिवस हा उत्सव चालतो. कोकणात शिमगोत्सव अगदी भव्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

शिमग्याच्या दिवसांत ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी येतात. त्यामुळे वर्षाने घरी येणाऱ्या ग्रामदेवतेची भेट घेण्यासाठी प्रत्येक कोकणी माणूस वेळ काढून आणि सुट्टी टाकून शिमग्यासाठी कोकणातल्या गावात पोहोचतो. सामान्य कोकणी माणसाबरोबरचे अनेक कलाकारसुद्धा दरवर्षी कोकणात शिमग्यासाठी जातात.

अशातच यंदाच्या वर्षीसुद्धा मराठी कलाविश्वातील काही कलाकार कोकणात शिमग्यासाठी पोहोचले आहेत. यापैकीच एक कलाकार म्हणजे, विनोदी अभिनेता निखिल बने. निखिल बने हा कोकणातला असून दरवर्षी तो शूटिंगमधून ब्रेक घेत कोकणात शिमग्यासाठी जातो. यंदाही तो त्याच्या नवीन बाईकवरून कोकणात शिमग्यासाठी पोहोचला. कोकणात गेल्यानंतर त्यानं त्याच्या गावाच्या शिमगोत्सवाचे काही खास फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत.

शिमग्यासाठी कोकणातल्या गावी पोहोचला निखिल बने

कोकणातील चिपळूणमधील कापरे हे निखिलचं गाव आहे. ग्रामदेवीच्या पालखी सोहळ्यासाठी निखिल कोकणात गेला आहे. यावेळी निखिललं स्वत:च्या खांद्यावर ग्रामदेवीची पालखी नाचवली. तसंच त्यानं पारंपरिक पद्धतीचं ढोलवादनसुद्धा केलं. त्याने शेअर केलेल्या खास व्हिडीओमधून कोकणात शिमग्यात होणाऱ्या पारंपरिक लोककलांची झलकसुद्धा पाहायला मिळत आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी निखिलच्या साधेपणाचं कौतुकसुद्धा केलं आहे.

निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “हीच तर कोकणाची परंपरा आहे”, “कोकणात जन्माला यायला नशिब लागतं”, “सुख काय असतं ते शिमग्यात कळतं”, “यापुढं जगातलं कसलीच मजा नाही”, “याला म्हणतात खरा कोकणी माणूस” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

निखिल बनेने शेअर केला गावच्या शिमगोत्सवाचा व्हिडीओ

दरम्यान, निखिल बने हा छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात तो अनेक विनोदी भूमिका साकारत आहे. त्याच्या विनोदी अभिनयाने तो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करतो. त्याच्या प्रत्येक स्किटमधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.

\याशिवाय निखिलनं काही मराठी सिनेमातसुद्धा काम केलं आहे. ‘बॉयज् ४’, ‘चिकी चिकी बुबूम बूम’ आणि ‘लास्ट स्टॉप खांदा’ या मराठी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसंच निखिल सोशल मीडियावरसुद्धा चांगलाच सक्रीय असतो. निखिलचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. यावर तो त्याचे काही दैनंदिन अपडेट्स शेअर करत असतो.