Marathi Actress Esha Dey Mehandi : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अनेक नवीन कलाकार घराघरात पोहोचले. त्यांना महाराष्ट्रभरासह जगभरात एक वेगळी ओळख मिळाली. आपल्या अनोख्या विनोदी शैलीनं शोमधील प्रत्येकानेच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ईशा डे. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

काल (८ मार्च, रविवार) तिनं ग्रहमख विधीचा खास फोटो शेअर करीत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिची मैत्रीण आणि अभिनेत्री सायली परब-शेलारनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईशाचा ग्रहमख विधीच्या लुकमधील फोटो शेअर केला होता. ग्रहमख विधीसाठी ईशाने आकाशी रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे. सायली ईशाच्या डोक्याला मुंडावळ्या बांधत असल्याचंदेखील या फोटोमधून पाहायला मिळालं.

ईशा डेच्या मेहंदीसाठी पोहोचली वनिता खरात

अशातच आता ईशाला होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदीसुद्धा लागली आहे. ईशाच्या मेहंदी सोहळ्यासाठी तिची सहकलाकार आणि अभिनेत्री वनिता खरात पोहोचली आहे. वनितानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघींचा एकत्र फोटो शेअर केला आहे आणि ‘माझ्या ईशाची मेहंदी’ असं म्हटलं आहे.

वनितासह अभिनेत्री छाया कदमसुद्धा ईशाच्या मेहंदी सोहळ्याला पोहोचल्या आहेत. तसंच अभिनेत्री सायली परब-शेलार आणि ईशाच्या इतर काही मैत्रिणीसुद्धा तिच्या मेहंदीला पोहोचल्या आहेत. ईशानं तिच्या मेहंदीसाठी पंजाबी ड्रेस परिधान केला असून तिच्या हातावर मेहंदी असल्याचंसुद्धा पाहायला मिळतंय.

ईशा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. अशातच काल अचानक सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या आधीच्या विधीचे फोटो समोर आले. यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनासुद्धा सुखद धक्का बसला आहे. आता ग्रहमख, मेहंदी सोहळा पार पडल्यानंतर आता ईशा लग्नबंधनात कधी अडकणार? तिचा होणारा नवरा कोण आहे? याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

वनिता खरातने शेअर केलेला ईशा डेचा फोटो

Esha Dey Mehendi photo
ईशा डे मेहंदी फोटो

दरम्यान, मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी यांनी लग्नगाठ बांधली. तसंच गीतकार संदीप खरे यांची लेक रुमानीसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे. त्यात आता ईशा डेची घरीसुद्धा लगीनघाई सुरू झाली आहे.

विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशाने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्येसुद्धा ती स्किट्समध्ये विविध भूमिका साकारताना दिसते. तिनं ‘सुखी माणसाचा सदरा’ व ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर ‘गुलकंद’ या मराठी सिनेमातदेखील ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली.