मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षात रेवती लेले, अपूर्वा गोरे, रूमानी खरे-स्तवन शिंदे असे अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. आता यांच्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सुरू झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमुळे घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ईशा डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
ईशा डेने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ग्रहमख विधीचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. यानंतर ईशाचा मेहंदी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सायली परब, छाया कदम, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर असे बरेच कलाकार तिच्या मेहंदी समारंभाला उपस्थित होते. आता ईशा लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. ईशाचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते.
एवढे दिवस एकाही पोस्ट किंवा व्हिडीओमध्ये ईशाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल खुलासा केला नव्हता. पण, वनिता खरातने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ईशासह तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केलं आहे.
ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे अभिषेक खणकर. तो लेखक व गीतकार म्हणून ओळखला जातो. अभिषेकने ‘खुलता कळी खुलेना’, ‘लक्ष्मी निवास’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांसाठी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
वनिता, रोहित माने आणि प्रियदर्शिनी या तिघांनी लग्नमंडपातील फोटो शेअर करत या पोस्टमध्ये ईशा आणि अभिषेक यांना टॅग केलं आहे. याशिवाय अभिषेकच्या काही जवळच्या मित्रांनी सुद्धा सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ईशाच्या लग्नाला सचिन गोस्वामी, समीर चौघुले, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, आकांक्षा गाडे, मकरंद देशपांडे हे सगळे कलाकार उपस्थित राहणार आहेत. “वऱ्हाड निघालंय” अशा पोस्ट या कलाकार मंडळींनी सध्या शेअर केलेल्या आहेत.

दरम्यान, संपूर्ण कलाविश्वातून आज ईशा डेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आता ईशा अधिकृतरित्या तिच्या लग्नाचे फोटो केव्हा शेअर करणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
