scorecardresearch

“पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावासाठी खास पोस्ट

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर तिच्या मोठ्या भावाबरोबरचा १० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे

“पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावासाठी खास पोस्ट
(फोटो सौजन्य- नम्रता संभेराव इन्स्टाग्राम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. नम्रता एकापेक्षा एक सुंदर पात्र या कार्यक्रमाध्ये साकारताना दिसते. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. अनेकदा ती सोशल मीडिया पोस्टमधून आपल्या कुटुंबियांप्रती भावना व्यक्त करताना दिसते. आताही तिची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मोठ्या भावाबरोबरचा १० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. नम्रता संभेरावच्या भावाचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्याला शुभेच्छा देण्यासाठी तिने खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये बहीण- भावाचं प्रेम दिसून येत आहे. विशेष म्हणजे नम्रताने शेअर केलेला हा फोटो तिच्याच लग्नातील आहे.

आणखी वाचा-“गरोदरपणात सात महिन्यांपर्यंत…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव स्वतःच्याच सासूबाईंबाबत काय म्हणाली?

नम्रता संभेरावची पोस्ट-

“दादा तू आज जगातला श्रीमंत माणूस आहेस, मला गर्व, अभिमान वाटतो तुझा कारण तू श्रीशा आणि वीरा दोन मुलींचा बाबा आहेस त्या सुद्धा खूप नशीबवान आहेत त्यांना तू आणि वहिनी आई बाबा म्हणून लाभले. तुझ्यात सगळ्यांना सांभाळण्याची खूप ताकद येवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. हा आपला १० वर्षांपूर्वीचा माझ्या लग्नाच्या दिवशीचा फोटो आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले होते. लहानपणी बहीण भावांची कितीही भांडणं झाली तरी हा दिवस आपल्यातलं नातं किती घट्ट आणि आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सांगून जातं. दादा अजूनही आपण जेव्हा बोलतो तेव्हा लहान असल्याचं फिलिंग येतं. आपल्यातला वेडेपणा असाच टिकून राहो. तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा, खूप प्रेम दादा.”

दरम्यान कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आली. तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते. चक्क अभिनेते जॉनी लिवरदेखील तिचे फॅन आहेत. नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:00 IST

संबंधित बातम्या