Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा चाहतावर्ग जगभरात आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. शिवाली परब, प्रियदर्शिनी, रोहित माने, निखिल, मंदार, प्रथमेश हे सगळेच कलाकार या शोमुळे प्रसिद्धीझोतात आले. या सगळ्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान आहे. हे कलाकार अनेकदा एकत्र ट्रिपला किंवा आऊटिंगला जात असतात. नुकतेच या शोमधील तीन लोकप्रिय कलाकार एकत्र कोकण फिरायला गेले होते. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हास्यजत्रेतील कलाकार निखिल बने, प्रथमेश शिवलकर आणि मंदार मांडवकर हे तिघंही नुकतेच दापोली फिरायला गेले होते. रत्नागिरीतील दापोली गाव निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत दापोलीच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे.
निखिल, प्रथमेश आणि मंदार यांनी या ट्रिपदरम्यान दापोलीतील स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे पाहिले. याठिकाणच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच हे तिघंही कोकणी वाड्याची थीम असलेल्या कोस्टल वाडी होमस्टेमध्ये राहिले होते. या ट्रिपचे व्हिडीओ, फोटो या तिघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रथमेश आपल्या मित्रांसह सेल्फी फोटो शेअर करत लिहितो, “असे अचानक ठरलेले प्लॅन्स कायमच यशस्वी होतात.” या तिन्ही कलाकारांच्या बॉण्डिंगचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

खरंतर, निखिल बने चिपळूणचा असल्याने त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमधून कायमच प्रेक्षकांना कोकण दर्शन होत असतं. काही दिवसांपूर्वीच तो कोस्टल कोकण बाईक राईडला गेला होता. या सोलो ट्रिपमध्ये निखिलने कोकणातील सुंदर जागा, मंदिरे, मालवणी खाद्यसंस्कृती एक्स्प्लोअर केली होती.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते बुधवार असे तीन दिवस रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो. हास्यजत्रेचं हे १९ वं पर्व असून, लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक या शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. तर, गेली कित्येक वर्षे अभिनेत्री प्राजक्ता माळी हा शो होस्ट करत आहे.
