Shivali Parab on Nimish Kulkarni And Komal Bhaskar Dance: अभिनेता निमिष कुलकर्णीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्याबरोबरच तो विविध भूमिकाही साकारताना दिसतो. सध्या तो ‘सनई चौघडे’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करीत आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेत त्याने मॅक ही भूमिका साकारली आहे. त्याचे डायलॉग्ज कायमच लक्ष वेधून घेत असतात. जय आणि मॅक यांच्यातील संवादामुळे प्रेक्षक खळखळून हसतात; तर शर्वरी व मॅक यांच्यातील बहीण-भावाच्या नात्याचेदेखील वेळोवेळी कौतुक होते.

निमिष कुलकर्णी व कोमल भासकरचा कमाल डान्स

निमिष मालिकेबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आता त्याच्या पत्नीने कोमल भासकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये निमिष त्याच्या पत्नीबरोबर डान्स करत असल्याचे दिसत आहे. दीदी तेरा देवर दीवाना या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला ते उत्तम डान्स करीत असल्याचे दिसत आहेत. मात्र, त्यानंतर डान्समध्ये काही चुका होताना दिसत आहे. असे असले तरी ते कुठेही थांबले नाहीत आणि त्यांचा डान्स तसाच सुरू ठेवला. यादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कोमलने लिहिले, “त्याला मी यशस्वीपणे डान्स फ्लोअरवर आणले. दोन सेकंदांसाठी आम्ही प्रोफेशनप्रमाणे डान्स करीत होतो; पण त्यानंतर चुका झाल्या”, असे लिहीत तिने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. कोमलने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या सगळ्यात मात्र लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परबची कमेंट लक्ष वेधून घेत आहे.

शिवालीने, “शेवटी माझ्या मित्राला स्वत:च्या तालावर नाचवलंसच. बरं झालं, असंच पाहिजे याला”, असे लिहीत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या. तर नेटकऱ्यांच्या, “तुम्ही छान डान्स केला”, “क्यूट डान्स”, “प्रचंड आवडलंय”, “निमिष छान डान्स करतो”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, निमिष काम करीत असलेल्या सनई चौघडे या मालिकेत विविध ट्विस्ट येताना दिसतात. सध्या जय व शरू यांच्यात मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता ते एकमेकांच्या प्रेमात पडणार का, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.