scorecardresearch

“आंबा, करवंद, काजू बोंडासकट…” कोकणाच्या आठवणीत रमला ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’चा कलाकार, मुलाचा व्हिडीओ व्हायरल

“पडलेला आंबा कोणीही उचलला तरी ते फळ मलाच मिळायचं ….”

prasad khandekar
प्रसाद खांडेकर

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणून प्रसाद खांडेकरला ओळखले जाते. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रसाद सगळ्यांना खळखळवून हसवतो. नुकतंच प्रसाद खांडेकर हा त्याच्या कुटुंबाबरोबर गावी गेला आहे. त्यानिमित्ताने त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रसाद खांडेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने त्याच्या बालपणीची आठवणीही ताज्या केल्या आहेत.
आणखी वाचा : “…अन् १५ सेकंदात सर्रकन भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून गेला”; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

प्रसाद खांडेकरची पोस्ट

“आमच्या बागेतील चिकूच झाड…..गावी श्लोक ला घेऊन गेलो होतो त्यावेळी बाजारात मिळणारी फळं आपल्या बागेतून अशी ताजी ताजी तोडण्यात श्लोक ला वेगळीच मज्जा येत होती … त्याचा तो चेहरा बघून मला माझं बालपण आठवलं …. बाबांसोबत मे महिन्यात गावी जायचो त्यावेळची फळफळावळ अवर्णनीय असायची

गावी पिंपळा च्या पानांचे द्रोण करायचे आणि मग करवंद तोडुन त्यात जमा करून आणायची आणि मग पुढे ती करवंद खाताना कोंबडा की कोंबडी अस एकमेकांना विचारत guess करत करत खायचे ….लाल असेल तर कोंबडा आणि सफेद असेल तर कोंबडी (हे उलट ही असू शकत आता नीट आठवत नाहीये )

मला कापा फणस आवडायचा बहिणींना बरका फणस आवडायचा ….. फणस खाल्ल्यावर पाणी प्यायचं नाही असा आजीचा आईचा काकूचा नेहमीचा दम … काजूच्या झाडावरून काजू बोंडा सकट काढून आणले की वरचे बोन्ड तिखट मीठ लावून खायचं आणि काजू चुलीत भाजून नंतर ते संपूर्ण अंगाला काळ फासून ती काजी फोडत खायची ….जीभ जांभळी होईपर्यंत जांभळ खायची आणि मग एकमेकांना जीभ दाखवत चिडवायच

आमच्या गावी घराच्या खळ्या समोरच एक आंब्याचं झाड होत . वाडीत सगळे “चाफ्याचा आंबा” म्हणायचे त्याला …मे महिन्यात बाबांसोबत गावी गेलो की आम्ही भावंड अंगणात बसून असायचो …दुपारच्या गप्पा आणि खेळ सुरू असताना मध्येच आंबा पडल्याचा “धप्प” असा आवाज आला की सगळी भावंड अंगणातून चाफ्याच्या आंब्याकडे पळत जायचो .. झाडावर पिकून आता आपलं अवतार कार्य संपलय ह्या भावनेने स्वतःहुन आंबा जो झाडावरून पडतो त्या आंब्याची चवच वेगळी ..आता हा पडलेला आंबा कोणीही उचलला तरी मी शेंडे फळ लाडका असल्यामुळे ते फळ मलाच मिळायचं ….

पुढे घर बांधताना आणि घरासमोरील रस्ता तयार होताना चाफ्याचा आंबा तोडायला लागला … संपूर्ण गाव इमोशनल झालं होतं …..कारण आमचा चाफ्याचा आंबा वाडीसाठी लँडमार्क होत …… चाफा तोडला तरी त्याला सोबतच ठेवलं आम्ही …. घरातल्या वाश्यासाठी चाफ्याची लाकडं वापरली

श्लोक ने चिकू तोडल्यावर चिकूच्या देठाजवळून पांढरा चीक बाहेर आला ते बघून श्लोक मला म्हणाला बाबा चिकुचं व्हाइट ब्लड बाहेर आल तेव्हा मनात विचार आला की श्लोकची आत्ताची पिढी कदाचित हे सगळं अनुभवणार नाही पण जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे त्यांना हा अनुभव दिला पाहिजे …..गाव अनुभवलं पाहिजे”, असे प्रसाद खांडेकर म्हणाला.

प्रसाद खांडेकरच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. खरंय….मुलांना गावाकडची ओढ असायला पाहिजे आणि गावाकडचं जीवन किती भारीयं हे कळले पाहिजे……मस्त प्रसाद, अशी कमेंट प्रसाद खांडेकरने केली आहे. खरंय गाव‌ हे अनुभवलच पाहीजे,व बालपणात या गोष्टी मग चिंचा ,आंबे ,फणस,पपई, काजू,करवंद,आवळे,पेरू,सिताफळ ,रामफळ,चिकू,जाभळं ,नारळ हे ना झाडाचं स्वता काढून खायचि ति मजाच वेगळी, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:28 IST
ताज्या बातम्या