Prasad Khandekar reply on fan troll comment ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. या मालिकेत कलाकार साकारत असलेल्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात असं घर केलंय, की अनेक चाहते त्यांना त्यांच्या पात्रांच्या किंवा स्किटमध्ये वापरलेल्या नावाने हाक मारतात. बरेचदा या कलाकारांशी बोलताना चाहते नाव चुकवतात किंवा कोणत्याही नावाने हाक मारतात. असंच काहीसं अभिनेत्री प्रसाद खांडेकरबरोबर घडलं. मग त्याने त्या कमेंटला रिप्लाय दिला आणि थेट स्क्रीनशॉट त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांचं “थेट तुमच्या घरातून” नावाचं नाटक आहे. हास्य, मनोरंजन आणि कौटुंबिक नात्यांची सुंदर गुंफण असलेलं धमाल नाटक खूप चर्चेत असतं. तर या नाटकाच्या आगामी प्रयोगांबद्दल नम्रता व प्रसाद त्यांच्या सोशल मीडियावरून माहिती देत असतात. सोमवारी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून नाटकाचे प्रयोग मुंबईत कधी असतील, त्याची सविस्तर माहिती दिली. याच व्हिडीओवर एक कमेंट आली.

प्रसाद खांडेकरची पोस्ट

“नमा खांड्या पुण्यात कधी प्रयोग होणार,” अशी ती कमेंट होती. या कमेंटला प्रसाद खांडेकरने उत्तर दिलं. प्रसादने लिहिलं, “छान नाव ठेवलं आहे ओ माझं प्रसाद.. एकवेळ पश्या बोला चालेल, खांडेकरचं खांड्या खूपच झालं…माझे चड्डीतले मित्र पण अशी हाक मारत नाहीत मला…तुमचं आडनाव…वायपातोडकर स्पेलिंगच वाचता येत नाहीये नाहीतर मी तुम्हाला पण चिडवलं असतं. वायड्या पातोड्या वगैरे.. मग कळलं असतं तुम्हाला.”

या कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत प्रसाद खांडेकरने कॅप्शनमध्ये लिहिलं, “त्यांनी (S. M. दादानी) प्रेमानेच स्किटमधल्या खांड्या नावाने हाक मारली असेल पण… शपथ जवळचे मित्र ‘पश्या’ म्हणतात आणि आई फक्त ‘बाबू’ म्हणते …बाकी खांड्या फक्त स्किटमध्येच ओ.” प्रसादने हसणारा इमोजी वापरून ही पोस्ट केली आहे.

‘कलाकार आहेत तुम्ही जरी प्रयोगात तुम्हाला असे म्हणत असले तरी तो तुमचा प्रयोगाचा एक भाग आहे.. पण अस चिडवून बोलणं खूप चुकीचं आहे…कलाकाराला पण इज्जत असते,’ ‘शिस्तीत रिप्लाय दिला,’ ‘मुद्दा हा आहे की स्किटमध्ये जी नावे घेतली जातात, ती त्या कलाकारांच्या तोंडूनच ऐकायल बेस्ट वाटतात. वाचायला तर मुळीच आवडलं नाही.’ ‘भाई, एकदम बरोबर आणि कणखर भूमिका घेतलीस. अतिशय सटीक उत्तर. जबरदस्त’, अशा कमेंट्स प्रसाद खांडेकरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.