सध्या सर्वत्र गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. घरोघरी विराजमान होणाऱ्या लाडक्या बाप्पासाठी सजावट, आकर्षक रोषणाई आणि पंचपक्वान्नांची लगबगही पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने अनेक कलाकार गणेशोत्सवाच्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापने गणरायाला अनोखं साकडं घातलं आहे.
अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालणारा अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. तो या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याला त्याच्या गणपतीच्या आठवणींबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने दिलखुलास उत्तर दिले.
आणखी वाचा : “यंदा मला कोकणात जाता येणार नाही, कारण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला “माझ्या घरी…”




“गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मी फारच उत्सुक आहे. मी खूप उत्साही आहे. पण ज्यादिवशी गणपती बाप्पा येतात, त्या दिवशी आमचं शूट आहे. त्यामुळे त्या दोन दिवसांनंतर तिसऱ्या दिवशी मला सुट्टी आहे. त्यादिवशी आपण पहिल्या दिवशी मिरवणुकीत नाचतो, ते मी तिसऱ्या दिवशी नाचणार आहे”, असे पृथ्वीक प्रताप म्हणाला.
“मी बाप्पाकडे स्वत:साठी खूप काही मागत असतो. पण यावर्षी आपल्या आजूबाजूला अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी बाप्पाने आम्हा सर्वांचे भूतलावर असलेल्या सर्वांचेच भलं करावं. प्रत्येकाच्या आयुष्यातील ज्याप्रमाणे हे ११ दिवस आनंदाचे असतात, तसे ते ३६५ करावे, असं मला मनापासून वाटतं”, असेही साकडं पृथ्वीकने यावेळी घातलं.
दरम्यान पृथ्वीक प्रताप हा लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॉय’ असं आहे. यात त्याच्याबरोबर अभिनेता प्रथमेश परब स्क्रीन शेअर करणार आहे.