छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौघुले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. चौघुलेंनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. १९९७ सालातील जवळपास २५ वर्षांपूर्वींचा तारुण्यातील फोटो शेअर केला आहे.
समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला त्यांनी “‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा”, असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा>> “नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक मोठा उंदीर स्टेजवर आला अन्…” किरण मानेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…
महाराष्ट्राची हास्यजत्रेतून प्रेक्षकांना हसवणारे समीर चौघुले सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चौघुलेंनी मालिकांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.