Shivali Parab on Prithvi Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. त्यापैकी एक शिवाली परब ही अभिनेत्री आहे. अभिनेत्री महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते.
नुकतीच शिवाली परब व पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी ‘सकाळ प्रीमिअर’शी संवाद साधला. यावेळी शिवालीला विचारण्यात आले की, पृथ्वीक प्रतापची कोणती गोष्ट खटकते? त्यावर पृथ्वीक म्हणाला की, मी रागावतो ही गोष्ट तिला खटकणारी आहे. त्यावर शिवाली म्हणाली की, मी बोलणं ऐकून घेऊन शकते.
शिवाली परबला खटकते पृथ्वीक प्रतापची ‘ही’ गोष्ट
पुढे शिवाली म्हणाली, “तो कधीतरी कोणत्या तरी गोष्टींवर जास्त रिअॅक्ट होतो, ही गोष्ट मला खटकते”. त्यावर पृथ्वीक म्हणाला की मला हे पटलेलं आहे. ती कधी कधी मला थांबवते. म्हणते दादा बास आता. त्यावर मी तिची माफी मागतो.
पृथ्वीक प्रतापबद्दल शिवाली परब असेही म्हणाली, “तो खूपच भारी आहे. खरं तर तो माझा मानलेला भाऊ आहे. मला त्याचं कायम कौतुक वाटतं. त्याच्याकडे एक कलाकार म्हणून कमालीची क्षमता आहे. तो इतरांच्या गोष्टी समजून घेऊन, त्यावर रिअॅक्ट होतो. हे फार कमी लोकांना येतं. हे केव्हा जमतं? जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील तसे असता. कोणी काही सांगितलं, तर समजून घेता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. तर ही गोष्ट कामातही दिसत असते. त्याची ही गोष्ट मला फार आवडते”, असे म्हणत पृथ्वीक प्रतापचे कौतुक केले.
शिवालीच्या या वक्तव्यावर पृथ्वीक प्रताप म्हणाला की, तिने ही गोष्ट मला आतापर्यंत सांगितली नव्हती. आम्ही इतकी वर्ष राखी बांधतो. जर रक्षाबंधनाच्या वेळी भेट झाली नाही, तर त्यानंतर ती मला राखी बांधते. पण, आतापर्यंत तिने मला ही गोष्ट सांगितली नव्हती.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोबरोबरच अभिनेत्री काही चित्रपट व नाटकांतूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच ती ‘मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात तिने अॅसिड अटॅक झालेली व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या.
दरम्यान, पृथ्वीक प्रताप व शिवाली परब यांचा चाहतावर्ग मोठा आहे. दोन्ही कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. डान्स रीलच्या माध्यमातूनदेखील हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.