Nashik Bhondubaba Ashok Kharat Controversy : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशभरात खळबळ निर्माण केली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, राज्यात ठिकठिकाणी मालमत्ता खरेदीसारख्या काही कारणांमुळे अशोक खरात हे नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, आता २९ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू आहे आणि या प्रकरणी रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. सर्वच माध्यमांमधून अशोक खरातविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. अनेक जण त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्याने या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे.
अशोक खरात प्रकरणी श्रमेश बेटकरची पोस्ट
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत पोहोचलेला श्रमेश बेटकर याने अशोक खरातप्रकरणी मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. श्रमेश सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. त्याचबरोबर अभिनेता राजकीय-सामाजिक मुद्द्यांवरसुद्धा त्याची स्पष्ट मते व्यक्त करत असतो. अशातच त्याने अशोक खरातप्रकरणी मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.
“समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपला मेंदू…”
“साप म्हटलं की तो चावणारच. त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो? आपण स्वत:ला गंडवून का घेतो? याचा शोध घेणे गरजेचे आहे”, अशी पोस्ट श्रमेशने त्याच्या फेसबुक अकाउंटद्वारे शेअर केली आहे. श्रमेशने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीसुद्धा विविध प्रतिक्रियांमधून त्यांची मते व्यक्त केली आहेत.
अशोक खरात प्रकरणी सचिन गोस्वामींची पोस्ट
श्रमेशबरोबरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांनीसुद्धा या प्रकरणी एक ओळीची पोस्ट शेअर केली आहे. “प्रयत्ने चिंचोकी घासता, लाख ही मिळे…” अशी व्यंगात्मक पोस्ट करीत त्यांनी अशोक खरातप्रकरणी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. याआधी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीसुद्धा “पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्याआधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?” अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, एका महिलेने केलेल्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १८ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला अटक केली. तेव्हापासून खरात पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीतील त्याचा हा मुक्काम न्यायालयाने पुन्हा २९ मार्चपर्यंत वाढवला आहे.
