Vanita Kharat Mudgal workout: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळताना दिसते. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, गौरव मोरे अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात, त्यामुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग आहे.

या शोबरोबरच हे कलाकार सिनेमाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येतात. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे कलाकार चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियामुळे आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल अधिक माहिती जाणून घेणे चाहत्यांसाठी सोपे झाले आहे. कलाकारही त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी शेअर करताना दिसतात.

वनिता खरातचा वजन कमी करण्यासाठी अनोखा प्रयोग

अभिनेत्री वनिता खरात गेल्या काही महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ती विविध व्यायाम करते, त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सहकलाकारांना व्यायामाचे चॅलेंज दिल्याचे व्हिडीओही पाहायला मिळाले होते. आता वनिताने नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये ती पारंपरिक पद्धतीने व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. ती मुदगलाने व्यायाम करत आहे. व्यायाम सुरू करण्याआधी ती मुदगलाच्या पाया पडत असल्याचे दिसते, त्यानंतर ती व्यायाम करते. वेगवेगळ्या पद्धतीने ती मुदगल फिरवत असल्याचे दिसत आहे. आधी एका हाताने, नंतर दोन्ही हातांनी वनिता मुदगल फिरवत असल्याचे दिसते. तसेच, ती आधी कमी वजन असलेल्या मुदगलाने व्यायाम करत असून नंतर जास्त वजन असलेल्या मुदगलाने व्यायाम करत असल्याचे दिसते. त्यानंतर ती पुन्हा छोट्या मुदगलाने व्यायाम करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

वनिताच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तू खूप स्ट्राँग आहेस”, दुसऱ्या एकाने लिहिले, “सुंदर आणि स्ट्राँग”, आणखी एकाने लिहिले, “वजन कमी करणारच, पण घ्यावा तर असा. वनिता ताई ग्रेट”, एकाने लिहिले, “तू खरंच प्रेरणादायी आहेस”, आणखी एकाने लिहिले, “कमाल आहेस तू”, एकाने लिहिले, “तू खूप वजन कमी केले आहेस”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वनिताचे कौतुक केले; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

या सगळ्यात अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने वनिताचे कौतुक करत लिहिले, “हे सगळं करायला खूप ताकद लागते, वनी तुझ्यात खूप ताकद आहे.”

दरम्यान, वनिता गेल्या अनेक दिवसांपासून वजन कमी करण्यासाठी ती काय करते, कोणते व्यायाम करते याबद्दलचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. चाहतेही तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिचे कौतुक करताना दिसतात.