अभिनयाचा कोणताही वारसा नसताना आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही अनेक कलाकारांनी अशा परिस्थितला सामोरं जात संघर्ष करत त्यांच्या कलेच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळखन निर्माण केली आणि त्यांची परिस्थिती बदलली. यापैकीच एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराज जगताप. विराजने नुकतंच त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

कलाकाराला संघर्ष चुकत नाही असं म्हणतात, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो पण तो प्रत्येकालाच करावा लागतो असं अनेक कलाकारही म्हणताना दिसतात. असंच काहीसं विराजच्याबाबतीतही घडलं. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या लूकवरुन त्याच्या जवळच्या माणसांनी त्याला हिणवलं होतं, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने त्याची आवड जपली आणि मेहनत करत स्वत:ची व कुटुंबाची परिस्थिती बदलली. परंतु, यादरम्यान त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. कधी वडापाव खाऊन दिवस काढले तर कधी स्टेशनवर झोपून रात्र घालवल्याचं त्याने सांगितलं आहे.

विराजने सांगितला खडतर प्रसंग

संघर्षाबद्दल सांगताना विराज जगताप म्हणाला, “लोक म्हणायचे अच्छा तुला अभिनेता व्हायचंय असं म्हणत टोमणो मारायचे. बोलायचे स्वत:कडे पाहिलंस का, बघ एक स्वत:ला, तेव्हा ते खरंही वाटायचं. माझ्याकडे पैसेही नव्हते म्हणून मी खचून गेलो होतो. जवळच्या माणसांनीच खूप ऐकवलं म्हणून मी आता सगळ्यांना मित्र म्हणत नाही. पण आता वातावरण बदललं आहे. काही जण आजही आनंदी नाहीच आहेत पण काही जण कौतुक करत आहेत. आज तेच लोक अभिमानाने सांगतात की तो विराज जगताप माझा मित्र आहे, भाऊ आहे वगारे”.

विराजने पुढे सांगितलं की कॉलेजमध्ये असताना घरच्यांनी पाठिंबा दिला की आवड आहे म्हणून करतोय, पण त्यानंतर त्यांनी पैसे देणं बंद केलं आणि तुझ तूच सगळं करायचं असं सागण्यात आलं. विराज याबद्दल म्हणाला, “तेव्हा खरंच पैसे नसायचे मग पूर्ण दिवस वडापाव खाऊन काढायचो. पैसे नव्हते म्हणून तिकीट न काढता प्रवास केला. असे काही दिवस होते.” पुढे कुटुंबाच्या परिस्थितीबद्दल बोलताना विराज म्हणाला, “मी आमच्या घरी आचारी येऊन दिवाळीत फराळ करायचा हाही दिवस पाहिला आहे आणि घरात गॅस संपलेली असताना दिवसभर उपाशी राहिलोय असाही दिवस पाहिला आहे. त्यावेळी मग थोडा वेळ छंद बाजुला ठेवला आणि नोकरी केली जेनेकरुन कुटुंबाला मदत करता येईल.”

विराज पुढे वडिलांच्या निधनाबद्दल म्हणाला, “बाबा असतानाही संघर्ष सुरू होता. ते गेल्यानंतर काही काळ होता पण नंतर महाराष्ट्राची हास्यजत्र सुरू झाल्यानंतर दिवस बदलले. पण वडिलांचं निधन माझ्या आयुष्यातील खूप मोठी घटना होती. त्या आधी मी मजा मस्ती करायचो. पण त्यानंतर म्हटलं की गाभीर्याने घ्यावं लागेल.” विराजने यावेळी त्याने खूप छोटी मोठी कामं केल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी खूप वेगवेगळी कामं केली आहेत. मी पेपर टाकायचो, दूध टाकायचो, बदलापूरमध्ये स्टेशनरीमध्ये, वाचनालयात नोकरी केली आहे, मेडिकलमध्ये नोकरी केली आहे, जे काही काम मिळायचं ते पैसे कमावण्यासाठी मी केलं आहे. नाटकाच्या टीममध्ये सामान उचलण्याचं काम केलं आहे. “

विराज पुढे म्हणाला, “आता महाराष्ट्राची हास्यजत्रामधला विराज पाहताना सगळ्यांना वाटतं की ह्याला काय सहज मिळालंय, त्याचं नशीब आहे. ठिक आहे माझ्यापेक्षाही वाईट दिवस लोकांनी काढले आहेत. लोक पेपरवर झोपलेले आहेत. माझी तितकी वाईट परिस्थिती नव्हती. पण जेव्हा बाहेर जायचो तेव्हा आम्ही पण तसेच झोपायचो. हातगाडीवर झोपायचो, स्टेशनवर तिकीट काऊंटवर झोपायचो, फाटकी बेडशीट घेऊन जायचो असे दिवस काढले आहेत.”