‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा दत्तू मोरे प्रसिद्धीच्या झोतात आला. पण या सगळ्या प्रवासात दत्तू करत असलेली मेहनत अगदी कौतुकास्पद आहे. सध्या तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वाती घुनागेसह लग्न करत दत्तूने सगळ्यांना सुखद धक्काच दिला. पण या दोघांचं लग्न कसं जमलं? त्यांच्या लव्हस्टोरीला नेमकी कुठून सुरुवात झाली? याबाबत दत्तूने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दत्तू व त्याची पत्नी स्वातीने त्यांच्या नात्याबाबत भाष्य केलं. दत्तू म्हणाला, “चार ते पाच वर्षांपूर्वी आम्ही दोघं एकमेकांना भेटलो. राहुल नावाचा आमच्या दोघांचाही एक मित्र आहे. त्याच्यामुळेच आमच्या दोघांची भेट झाली. फेबसुकद्वारे आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. पण एक- दोन वर्षांपूर्वीच आमची मैत्री अधिक फुलत गेली. ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघायला लागली. यानिमित्त आमच्या दोघांचं बोलणं सुरु झालं. त्यावेळी नुकतंच तिचं एम.ए. झालं होतं. त्यानंतर तिच्या कामात ती व्यग्र झाली. मीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या कामात व्यग्र झालो. पण या सगळ्यामध्ये आम्ही दोघं एकमेकांच्या कधी जवळ आलो ते अजूनही आम्हालाच कळलं नाही”.
दत्तूची पत्नी म्हणते, “तो सतत कामात असतो हाच त्याचा स्वभाव मला खूप आवडला होता. संसार करणारी ही व्यक्ती आहे हे मला जाणवलं. आमच्यामध्ये कामाविषयीच खूप गप्पा व्हायच्या. दत्तू त्याच्या कामाकडेच अधिकाधिक लक्ष देतो हे मला त्याच्याशी बोलता बोलता लक्षात आलं होतं. मला तो आवडत होता. पण मी ते त्याला कधी बोलून दाखवलं नाही. दोन ते तीनवेळा मॅसेज केला. पण मी ते मॅसेज डिलीट केले. लग्नासाठीही मीच त्याला आधी प्रपोज केलं”.
पत्नीने प्रपोज केल्यानंतर दत्तूने होकार देण्यासाठीही बराच वेळ लावला. त्या घरातील परिस्थिती व कामाचा व्याप पाहता त्याने सुरुवातीला स्वातीला होकार दिला नाही. पण दत्तूने होकार कळवल्यानंतर या दोघांची लव्हस्टोरी अगदी फुलत गेली. दिवसभराच्या कामानंतर सकाळी ४ ते ४.३० वाजेपर्यंत दत्तू आणि त्याची पत्नी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायचे. दरम्यान नकळत दोघांमध्ये जवळीक वाढत गेली असं दत्तूने सांगितलं.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem dattu more talk about his lovestory says she propose me first see details kmd