‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे विनोदवीरांना स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे गौरव मोरे. गौरव त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. आता त्याच्या चाहतावर्गामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. इतकंच नव्हे तर तो आता मराठी चित्रपटांसह जाहिरातींमध्येही काम करत आहे. त्याचा ‘हवाहवाई’ चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. आता गौरव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच गौरव त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही महिन्यांपूर्वी गौरव पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. शिवाय पहिल्यांदाच परदेश दौरा केल्यानंतर गौरवही खूप आनंदी होता. आता पुन्हा एकदा तो लंडनला गेला आहे.




गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावरील फोटो गौरवने शेअर केला आहे. “लंडन कॉलिंग” असं त्याने म्हटलं आहे. पण यावेळी गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला आहे हे त्याने गुपित ठेवलं आहे. पण गौरव चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच लंडनला गेला असल्याचं बोललं जात आहे. लंडनला जात असताना गौरवच्या चेहऱ्यावर अगदी आनंद दिसत आहे.

याआधी गौरव अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. तेव्हा गौरवने म्हटलं होतं की, “मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव सरांबरोबर लंडनला निघालो आहे. खूप उत्सुकता आहे. तसंच खूप भारी वाटत आहे. ज्यांना मी बाल्कनीमधून बघितलं आहे त्यांच्याबरोबर मी आज प्रवास करत आहे”. गौरव आता कशासाठी लंडन गेला आहे हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.