शहरात नेहमी ‘वेळ नाही’ म्हणणाऱ्या या माणसाला गावात आल्यावर वेळेचा एक वेगळाच निवांतपणा जाणवतो. मोबाईलचे नेटवर्क नसले तरी त्याला त्याचे दुःख होत नाही. शहरातल्या गर्दीतून, गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजातून आणि प्रदूषणातून सुटून जेव्हा तो व्यक्ती गावात पाऊल ठेवतो, तेव्हा सगळ्यात आधी त्याला जाणवतो तो तिथला शांत आणि मोकळा श्वास. सकाळी अलार्मच्या कर्कश आवाजाऐवजी पक्षांच्या किलबिलाटाने आणि कोंबड्याच्या आवाजाने जाग येते. हरात कधीही न दिसणारा मोकळा सूर्योदय आणि झाडांच्या पानातून येणारी कोवळी उन्हाची किरणं पाहून त्याच्या मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो. हाच निवांतपणा अनुभवायला अनेक कलाकारही थोडा ब्रेक घेऊन गावी जात असतात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेता गौरव मोरे सध्या गावी गेला आहे. त्याने गावी गेल्यावर काही फोटो काढले आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या गावची झलक पाहायला मिळत आहे. गौरव गावी निवांत वेळ घालवतोय, असं या फोटोंमधून दिसून येतंय.
एका फोटोत गौरव त्याचे केस निट करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत तो बैलांजवळ झाडाखाली निवांत बसलाय. तिसऱ्या फोटोत तो शेतात उभा आहे आणि पाठीमागे टेकडी दिसतेय. ‘माझं गाव’ असं कॅप्शन देत गौरव मोरेने हे फोटो पोस्ट केले आहेत.
पाहा गौरव मोरेचे गावाकडचे फोटो
दरम्यान, गौरव मोरेने ही पोस्ट केल्यावर त्याचं गाव नेमकं कोणतं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. गौरव स्वतःला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणतो. त्याने पवईतच घरही घेतलं आहे. पण त्याच्या गावाबद्दल फार लोकांना माहित नाही. गौरवनेही त्याबद्दल सांगितलेलं नाही. पण काही चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सारोळा हे गौरव मोरेचं गाव आहे असं म्हटलंय. मात्र त्यावर गौरवने कोणताही रिप्लाय दिलेला नाही.
दरम्यान, गौरव मोरे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. गौरव मोरे नुकताच त्याच्या नवीन घरात राहायला गेला. त्याचबरोबर त्याने लग्न देखील केलं. त्याच्या पत्नीचं नाव प्रियांका कारेकर आहे. गौरव व प्रियांका काही वर्षापासून डेट करत होते. यावर्षी त्यांनी लग्न केलं.
