Gaurav More Shares Video From His Village Farm: सध्याच्या काळात शहरातले जीवन म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारी एक न थांबणारी शर्यत झाली आहे. गावाकडे पाऊल ठेवताच हवेतला तो मोकळेपणा आणि निसर्गाचे बदललेले रूप शहरातल्या मनावरचा सगळा थकवा एका क्षणात दूर करतो. शहरात जे दिवस-रात्रीचे चक्र फक्त घड्याळानुसार चालते, ते गावात निसर्गाच्या सोबतीने अनुभवता येते. पहाटेची पक्ष्यांची किलबिल, थंडगार वारा आणि रात्रीची ती गर्द शांतता मानवी मनाला पुन्हा एकदा निसर्गाशी जोडतात. गावात कुठलीही घाई नसते; तिथली माणसं आणि तिथली जीवनशैली दोन्हीमध्ये एक प्रकारचा निवांतपणा असतो. शहरात राहणारे हाच निवांतपणा अनुभवायला वर्षातून काही दिवस गावी जातात.
अनेक मराठी कलाकार काही दिवसांचा ब्रेक घेऊन त्यांच्या गावी जातात आणि छान वेळ घालवतात. मराठी अभिनेता गौरव मोरेही सध्या गावात रमला आहे. गौरवने त्याच्या गावात गेल्यावर आकी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यानंतर त्याने आता शेतातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.
गौरव मोरे त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांबरोबर भर उन्हात शेतात गेला. पाऊस न पडल्याने अद्याप पेरणी झालेली नाही, त्याचबरोबर उन्हाचाही कहर आहे. अशा उन्हात शेतात गेल्यावर सर्वजण दमले आणि नंतर एका झाडाच्या सावलीत थोडा वेळ थांबले. ‘गाव’ असं कॅप्शन देत गौरव मोरेने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा गौरव मोरेच्या शेतातील व्हिडीओ
गौरव मोरेच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने ‘मज्जा कर आणि उद्या भेटुया’ अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी गौरव मोरेचं गाव कोणतं? अशा कमेंट्स केल्या आहेत. त्यावर त्याच्याच काही चाहत्यांनी गौरव मुळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सारोळा इथला असल्याचं कमेंट्समध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून गौरव मोरेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. काही महिन्यांपूर्वीच गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियांका कारेकर हिच्याशी लग्न केलं. तसेच तो पवई येथील नवीन घरात राहायला गेला. त्यानंतर तो मुंबईतील धावपळीच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन गावी गेलाय आणि गावाकडच्या निवांत वातावरणात रमलाय.
