Maharashtrachi Hasyajatra Vanita Kharat shares video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी शो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्यामुळे या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोबद्दल तसेच त्यामधील कलाकारांबद्दल प्रेक्षक वेळोवेळी बोलत असतात. या शोमध्ये समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर असे अनेक लोकप्रिय कलाकार काम करताना दिसतात.
हे कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विविध डान्स व्हिडीओ, ट्रेडिंग ऑडिओ तसेच सेटवरील मजा मस्ती अशा विविध व्हिडीओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अभिनेत्री वनिता खरातने आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“आता मी सगळ्यांकडून…”
वनिता खरात गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी ती व्यायाम करते. काही वेळा ती त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करते. आता तिने महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सहकलाकारांना दोरीउडी मारण्याचे चॅलेंज दिल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.
व्हिडीओमध्ये ती म्हणते की आता मी सेटवर आली आहे आणि आता मी सगळ्यांकडून दोरी उड्या करून घेणार आहे. जे नॉनस्टॉप ३० दोरीउड्या मारतील, त्यांना मी प्रोटीन बार देणार आहे. सुरुवातीला ओंकार भोजने येतो. तो न थांबता ५० दोरीवरील उड्या मारतो. वनिता त्याला प्रोटीन बार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिवाली परबही न थांबता ५० दोरीउड्या मारते. वनिता तिलाही प्रोटीन बार देते.त्यानंतर नम्रता ३२ दोरी उड्या मारते. नम्रतानंतर प्रभाकर मोरे येतात. ते हे चॅलेंज पूर्ण करू शकत नाहीत. त्यानंतर सचिन गोस्वामी येतात. वनिता त्यांना म्हणते की तुमच्यासाठी काऊंट कमी करते. तुम्ही १० दोरीउड्या मारा.ते हे चॅलेंज पूर्ण करू शकले नाहीत. पृथ्वीक प्रतापही हे चॅलेंज पूर्ण करू शकला नाही. अरूण कदम यांनी २५ दोरी उड्या मारल्या. त्यांनाही वनिताने प्रोटीन बार दिला. सेटवरील इतर कलाकारांनीही दोरीउड्या मारत वनिताच्या या चॅलेंजमध्ये सहभागी झाले. काही जणांनी हे चॅलेंज पूर्ण केले, तर काही जण हे करू शकले नाहीत.
वनिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत कलाकारांचे कौतुक केले आहे. तसेच, अरुण कदम यांनी २५ दोरी उड्या मारल्याने त्यांचेही अनेकांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचे एकमेकांशी उत्तम बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते. ते विविध मुलाखतींमध्ये इतर कलाकारांबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल वक्तव्य करताना दिसतात.
