Mahesh Kothare completes Nilima Kothare’s Ukhana: झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘धाकट्या सूनबाई’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली आहे. आता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेतील कलाकार आणि निर्माते महेश कोठारेंनी त्यांच्या पत्नी निलिमा कोठारेंसह हजेरी लावली आहे.
निलिमा कोठारेंनी घेतला उखाणा
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आदेश बांदेकर, महेश कोठारे, निलिमा कोठारे आणि इतर कलाकार बसले आहेत. आदेश बांदेकर निलिमा कोठारे यांना म्हणतात, “धाकट्या सूनबाई या मालिकेच्या निमित्ताने उखाणा घ्यायलाच पाहिजे.” त्यानंतर निलिमा कोठारे उखाणा घेतात.
निलिमा कोठारे म्हणतात, “मी आहे आदिनाथची आई, महेशचे नाव घेते…”, त्या वाक्य पूर्ण करण्याआधीच महेश कोठारे पुढे म्हणतात, “कारण तो घेऊन येत आहे धाकट्या सूनबाई.” त्यानंतर सगळे हसताना दिसतात.
आदेश बांदेकर म्हणतात, आजच्या खेळात जे जिंकणार, त्यांना मिळणार पैठणी. त्यानंतर कलाकार विविध खेळ खेळताना दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “येत्या २८ सप्टेंबरपासून आपल्या भेटीला येणाऱ्या ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेतील कलाकारांसह रंगणार पैठणीचा धमाल खेळ”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत वेदांत, दमयंती आणि राधिकाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचे प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेत चिन्मयी मोरे, मंदार जाधव, मुग्धा कर्णिक, सविता मालपेकर, मानसी सुरेश हे कलाकार महत्त्वांच्या भूमिकांत दिसणार आहेत.
