‘आमने सामने’ या नाटकाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. मानधन वाढवून मागितल्यामुळे निर्मात्यांनी एका रात्रीत रिप्लेस केलं, असं सांगत केतकी पालव आणि रोहन गुजर यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीही बाजू मांडली. अनेक मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्तेंनी हा विषय नेमका माहिती नाही पण, कलाकारांना एका रात्रीत काढून टाकणं चुकीचं आहे, असं सांगत प्रेमाने कानउघडणी केली होती. या पाठोपाठ आता या वादावर अभिनेते महेश मांजरेकर व्यक्त झाले आहेत.

महेश मांजरेकर ‘न्यूज १८ मराठी’शी संवाद साधताना म्हणाले, “मी दोन्ही व्हिडीओ पाहिले. पण, अशा पद्धतीने त्यांना नाटकातून काढणं हे कुठेतरी अनफेअर आहे. आता सात वर्षं ते कलाकार तुमच्याबरोबर होते. बरं मी या नाटकाला आधीपासून फॉलो केलंय. आधी हे नाटक चालायचं नाही, मग त्यांनी बंद केलं. परत प्रयोग सुरू झाले, कोव्हिडचा काळ…म्हणजे मंगेश-लीना यांनी सुद्धा खूप वाईट काळात या नाटकाला जगवलं आहे. पण, ते कलाकार सुद्धा सात वर्षं त्यांच्याबरोबर होते.”

मांजरेकर पुढे सांगतात, “तर, माझं म्हणणं असं आहे की, या गोष्टी समजुतीने सुटल्या असत्या. आता मलाही माहिती नाही की, या कलाकारांनी किती मानधन वाढवून मागितलं. आता तर नाटकाला धो-धो प्रतिसाद मिळतोय आणि यामध्ये फक्त चारच पात्र आहेत. तर, तुम्ही त्यांना बसवून सांगू शकला असतात की, हे बघा आता आम्हाला शक्य होणार नाही. तुम्हाला करायचं नसेल तर, आम्ही दुसरे कलाकार बघतो. आता काही प्रयोग करा. पण, एका रात्रीत त्यांना सांगणं की, उद्यापासून करू नका हे फार चुकीचं आहे. कारण, त्यांनीही तुम्हाला सात वर्ष साथ दिलीये.”

“आता मी पैशांचं सुद्धा काहीच बोलत नाहीये. तुम्ही वाढवा, वाढवू नका…मला काहीच याबद्दल माहिती नाहीये. पण, एका रात्रीत असं सांगू नका. मंगेश आणि टीमने अगदी कठीण काळात या नाटकाला सपोर्ट केलाय. मग, आता सगळं उत्तम सुरू असताना हे असं घडणं चुकीचं आहे. बरं मंगेश आणि लीना ही दोन्ही माणसं फार गोड आहेत. लीनाला तर नाटक पाहून मी बोललो होतो, तू जगातली बेस्ट अभिनेत्री आहेस. कारण, ती जे काही करतेय त्या नाटकात ते एका तरी हिंदी अभिनेत्रीने करून दाखवावं. बरं ते दोघेही त्यांना उत्तम साथ देत होते. त्यांची एक भट्टी जमली होती. पण, आता ते दोघं गेल्यामुळे आपल्याला असं चुकल्यासारखं वाटतं ना…जमलं तर त्यांनी हा विषय चर्चा करून सोडवावा.” असं महेश मांजरेकरांनी सांगितलं.