‘तुला जपणार आहे’ या झी मराठीच्या थ्रिलर मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री महिमा म्हात्रे प्रमुख भूमिका साकारत आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांची लाडकी मीरा ( मालिकेतील नाव ) नाकावर पट्टी लावून शूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिमाला नेमकं काय झालंय? याबद्दल चाहते कायम तिला कमेंट्समध्ये विचारत असतात. या गोष्टीला आता ८ महिने झालेले आहेत. युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत अखेर महिमाने या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. सेटवर अचानक अपघात झाल्याने मीराला ही दुखापत झाली होती.
महिमा म्हात्रे म्हणते, “गेले काही महिने मी नाकावर अन् कपाळाला पट्टी लावून शूटिंग करतेय. सगळेच मला विचारत आहेत, नेमकं काय झालं होतं आणि इतके महिने तुम्ही पट्टी लावून का शूट करताय? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. मध्यंतरी मी मालिकेत दिसत नव्हते…तेव्हा सुद्धा प्रेक्षकांनी मला खूप मनापासून मिस केलं, तशा कमेंट्स केल्या. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे कारण, आज मी ही नाकावरची पट्टी काढतेय. इतके दिवस तुम्ही सगळे प्रश्न विचारत होतात आणि मला कोणालाही उत्तरं देता येत नव्हती पण, आज इतक्या दिवसांनी मी ही पट्टी काढलीये आणि आता लवकरच तुम्हाला एपिसोडमध्येही मी जशी आहे तशीच तुम्हाला दिसेनच!”
मीरा पुढे म्हणाली, “मालिकेत मीरा खूप धाडसी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिल्या प्रोमोपासून आतापर्यंत सगळ्या प्रकारचे शूटिंग सीक्वेन्स मी केलेले आहेत. असाच एक सीन होता..मीरा अथर्वचा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. या सीनसाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. एका मैदानात हे शूटिंग पार पडणार होतं…आम्ही दोन-तीन शॉट शूट सुद्धा केले, सगळं छान सुरू होतं. पण, शेवटच्या सीनच्यावेळी घोडा खूप वेगाने धावत होता…मीरा अथर्व दोघंही घोड्यावर होते, शॉट कट होताना घोडा उधळला. त्या क्षणाला मला काहीच समजलं नाही. मी घोड्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, लगाम खेचला पण, काही केल्या तो घोडा कंट्रोल होत नव्हता. शेवटी आम्ही दोघंही पडलो. सगळेजण लगेच धावत आले…सुरुवातीला आम्हाला वाटलं की इतकं काहीच झालेलं नाहीये. पण, तेव्हा सेटवर शांतता होती…अचानक नाकावर रक्ताची धार लागली. त्याक्षणी मला जाणवलं काहीतरी मेजर झालंय. मला लगेच हॉस्पिटलला सुद्धा नेलं. तेव्हा मला समजलं की, खूप लागलंय…मला संपूर्ण माझं आयुष्य डोळ्यासमोर दिसत होतं. माझे सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला आले.”
पुढे अभिनेत्री सांगते, “मी तेव्हा दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्येच होते. नंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यानंतर मी काही दिवस शूटिंगमध्ये नव्हते. त्यानंतर मी एवढे दिवस ट्रिटमेंट घेत होते…म्हणून ती पट्टी होती. मला प्रोडक्शन हाऊसने सुद्धा खूप पाठिंबा दिला. हा अपघात झाल्यावर पुन्हा एकदा उठून उभी राहिले आणि शूटिंगला गेले. हा अपघात झाल्यावर सुद्धा मी सात-आठ दिवसांनी पुन्हा सेटवर गेले आणि शूट सुरू केलं. पट्टी लावून का होईना मी काम केलं. माझी औषधं सुरू होती, ट्रिटमेंट सुरू होती. हे सगळं प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, माझ्या कुटुंबीयांमुळे आणि प्रोडक्शनच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं.”
“अपघात झाल्यावर चेहऱ्यावर एक व्रण आला होता..त्यामुळे तो डाग अजून डार्क होऊ नये, तसेच सूर्यप्रकाश त्याला लागू नये यासाठी मी काळजीने ती पट्टी नाकावर लावत होते. जर पट्टी काढली असती, तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या. हे जितकं सोपं वाटतंय तितकं नक्कीच नव्हतं. तुम्ही मला खरंच सपोर्ट केलात त्यासाठी मनापासून थँक्यू! तुम्हा सगळ्यांमुळे मला खूप आधार मिळाला.” असं सांगत महिमाने सर्वांचे आभार मानले आहेत.
