Zee Marathi Tula Japnar Aahe Fame Actress Mahima Mhatre Engagement : यंदाच्या वर्षी मराठी मालिकाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली. अपूर्वा नेमळेकर, नंदिता पाटकर, ईशा डे, पूजा बिरारी अशा बऱ्याच अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. आता यांच्यापाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकताच या अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे; तिचं नाव आहे महिमा म्हात्रे. ‘झी मराठी’च्या ‘तुला जपणार आहे’ या थ्रिलर मालिकेमुळे महिमा घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये ती मीराची मुख्य भूमिका साकारत आहे.

प्रेक्षकांची लाडकी मीरा आता खऱ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करणार आहे. महिमाचा साखरपुडा नुकताच पार पडला असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या सर्वच चाहत्यांना सुखद बसला आहे. यामध्ये तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून महिमाच्या हातात अंगठी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिमाने यावेळी वेस्टर्न लूक केला होता. बेबी पिंक रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच गोड दिसतेय.

महिमा म्हात्रेचा होणारा नवरा कोण?

महिमा म्हात्रेच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे रोशन विचारे. तो सुद्धा अभिनेता आहे, आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये रोशनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं’, ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये रोशन झळकला आहे. महिमा आणि रोशनच्या साखरपुड्याचे फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत.

महिमाने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “We Are Happily Engaged” असं कॅप्शन अभिनेत्रीने साखरपुड्याच्या फोटोंना दिलं आहे.

दरम्यान, महिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘तुला जपणार आहे’ या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यापूर्वी तिने ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’, ‘दार उघड बये’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र, महिमा सध्या साकारत असलेली मीराची भूमिका सर्वांच्या मनात घर करून गेली आहे. रात्री उशिरा प्रसारित होऊनही ‘तुला जपणार आहे’ मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळत आहे.