Tula Japnar Aahe Fame Marathi Actress : ‘झी मराठी’ वाहिनीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका सुरू झाली. नुकतंच या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. महत्त्वाचं म्हणजे रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा या मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळतोय. अलीकडच्या काळात मालिकांमध्येही जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतात. कलाकार सुद्धा यासाठी प्रचंड मेहनत घेतात. अनेकदा १२ तासांहून अधिक वेळ शूटिंग सुरू असतं तरीही हे सगळे कलाकार न थकता, अगदी मनापासून काम करत असतात.
‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अभिनेत्रीला सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून नाकावर अन् कपाळावर दुखापत झाली आहे. तरीही अभिनेत्री बँडेज पट्टी लावून शूटिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे महिमा म्हात्रे. मालिकेत ती मीराची भूमिका साकारत आहे. डिसेंबर महिन्यात अॅक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सुरू असताना महिमा नेमकी पडली आणि तिला लागलं. गेल्या चार महिन्यांपासून अभिनेत्रीच्या नाकावर अन् कपाळावर पट्टी आहे.
महिमाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला प्रकृतीबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत. “मॅडम खूप दिवस झाले तुमच्या कपाळावर आणि नाकावर पट्टी आहे नेमकं काय झालंय?”, “आपण कपाळ आणि नाकावरची पट्टी कधी काढणार आहात?”, “मीरा आता तू कशी आहेस?”, “अजून तुमची जखम ठीक झाली नाही का?”, “तुम्ही छान दिसता म्हणून नजर लागली असेल, नेमकं काय झालंय?” अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
यावर महिमाने सुद्धा चाहत्यांना रिप्लाय दिला आहे, “काळजी करू नका थँक्यू…तुम्हा सर्वांचं असंच प्रेम काय राहूदेत. थोडं लागलं आहे डॉक्टर म्हणाले की लवकरच पट्टी काढणार”

दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यामध्ये महिमा म्हात्रेसह प्रतीक्षा शिवणकर, नीरज गोस्वामी, शर्वरी लोहकरे, मिलिंद फाटक, तनिष्का विशे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १३ एप्रिलपासून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता रात्री ११:०० वाजता ऑन एअर केली जाईल.
