Manasi Naik 40th Birthday : वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस…काही लोकांना वाढदिवस सेलिब्रेट करणं अजिबात आवडत नाही तर, याउलट काहीजण मोठ्या हौशेने थाटात बर्थडे सेलिब्रेशन करतात. मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने सुद्धा नुकतंच तिच्या ४० व्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. याचा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ या ‘झी मराठीच्या’ मालिकेत साध्याभोळ्या अमृताची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. नुकताच तिने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. मानसीच्या वाढदिवसाला तिचे जवळचे मित्रमंडळी याशिवाय कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. मानसीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास तयारी करण्यात आली होती.

बर्थडे सेलिब्रेशनच्या ठिकाणी मानसीची एन्ट्री होताच, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी मोबाइलच्या फ्लॅश लाइट्स ऑन केल्या. यानंतर गुलाबाच्या फुलांच्या गालिच्यावरून अभिनेत्रीने एन्ट्री घेतली. गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊन ड्रेसमध्ये मानसी खूपच सुंदर दिसत होती. तिच्या वेस्टर्न लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही संपूर्ण सजावट पाहून अभिनेत्री प्रचंड आनंदी झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर तिने प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय केला आणि शेवटी तिच्या ४० व्या वाढदिवसाचा केक कापला.

मानसी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “आणि बघता बघता मी ४० वर्षांचे झाले. माझ्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त या खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पॉझिटिव्ह वातावरणात, चांगल्या माणसांच्या सोबतीने मी हा खास दिवस साजरा केला. Eat. Dance. Laugh. Repeat. वय वाढलं पण, मनापासून एन्जॉय केलं. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी…कृतज्ञतेने भरलेलं मन..आणि सोबत असलेली माझी खास माणसं..पाहा माझ्या ४० व्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन”

मानसीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राप्ती रेडकर, रश्मी अनपट या अभिनेत्रींनी कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, मानसीने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘नवा गडी नवं राज्य’, ‘शाब्बास सुनबाई’, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये ती झळकली आहे. सध्या अभिनेत्री ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. ही मालिका वाहिनीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते.