Mandar Chandwadkar Was Not The First Choise For TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ज्यामध्ये काही मराठी कलाकारांचाही समावेश आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेता मंदार चांदवडकर. मंदार चांदवडकर गेली जवळपास दोन दशकं यामध्ये आत्माराम भिडे हे पात्र साकारत आहे. त्याच्या या पात्राला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पसंती मिळाली असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
मंदार चांदवडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तो यामार्फत शेअर करत असतो. अभिनेता अनेकदा मुलखतींमधूनही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेबद्दल सांगत असतो. अशातच आता नुकतीच त्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने त्याच्या आधी इतर दोन मराठी अभिनेत्यांना आत्माराम भिडेच्या पात्रासाठी विचारणा झाली होती याबद्दल सांगितलं आहे.
मंदार चांदडवकरच्या आधी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची ऑफर आली होती परंतु, त्यांनी काही कारणांमुळे ती नाकारली आणि याचा मंदारला आनंद असल्याचा त्याने सांगितलं आहे. आता तो नेमकं काय म्हणाला आहे आणि त्याच्या कास्टिंगचा किस्सा काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…
या दोन अभिनेत्यांना झालेली विचारणा
उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना मंदारने सांगितलं की ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सुपरहिट मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे या पात्रासाठी आधी अभिनेत पुष्कर श्रोत्री आणि नंतर शैलेश दातार यांना विचारणा झाली होती. अभिनेता म्हणाला, “पुष्करने नकार दिला आणि शैलेश त्यावेळी त्यांच्या कामात व्यग्र होते. पण, बरं झालं त्यांनी नाही केलं. म्हणूनच मला ही संधी मिळाली.”
याच मुलाखतीत मंदारला मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारावी असं नाही वाटलं का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “वाटलं तर खूप पण, कोणी दिलं नाही. पण, ते म्हणतात ना मिळालं तर चांगलं नाही मिळालं तर त्याहीपेक्षा चांगलं. ते मला मिळालं नाही म्हणून तर ही भूमिका मिळाली.”
