Mandar Jadhav shares his journey from Hindi TV to Marathi industry : मंदार जाधव छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. पण, यापूर्वी त्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अशातच आता अभिनेत्याने मराठी मालिकांमध्ये काम करण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.
मंदार जाधवने पहिल्यांदा ‘अल्लीदन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्याने इतर मालिका आणि क्राइम शोमध्ये काम केलं. अशातच आता ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने तो मराठी मालिकांकडे कसा वळला याबद्दल सांगितलं आहे. मंदारने यावेळी त्याची पहिली मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’ त्याला कशी मिळाली यामागचा किस्सा सांगितलं आहे.
मराठीत चांगल्या ऑफर येत नव्हत्या – मंदार जाधव
मुलाखतीत मराठीतील पहिलीच मालिका त्यात अशी भूमिका साकारली खूपच आव्हानात्मक असेल, काय तयारी केली त्यासाठी असं विचारल्यानंतर मंदार म्हणाला, “खूपच आव्हानात्मक होतं. स्क्रीनवर दत्त गुरू साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती, पण जे तुमच्या नशीबात लिहिलेलं असतं ते तुम्हाला कसं मिळतं याचं हे उदाहरण आहे. म्हणजे मी इतकी वर्षे हिंदीत काम करतोय. नायकाच्या भूमिका केल्या, सहाय्यक भूमिका केल्या, खलनायक साकारला. मराठी करायचं होतं, पण चांगल्या ऑफर येत नव्हत्या.”
मेघन जाधवला होती पहिली पसंती
मंदार हा किस्सा सांगत पुढे म्हणाला, “एक दिग्दर्शक आहेत संतोष देवधर. त्यांना मी याचं श्रेय देइन. सरांनी माझ्या लहान भावाला मेघनला फोन केला होता की मेघन श्री गुरुदेव दत्त ही मालिका करत आहोत आणि आम्ही तुझा विचार करत आहोत, पण मेघन म्हणाला, सॉरी सर मी हिंदी मालिकेत व्यग्र आहे. पण, माझा भाऊ मंदार आहे. जर तो तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याला संपर्क करा. मग मला त्यांचा फोन आला. मी म्हणालो नाही सर मला मराठी मालिका करायची आहे पण, मला पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेतून एन्ट्री घ्यायची आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे.”
मंदारने सांगितला ऑडिशनचा किस्सा
मंदार पुढे म्हणाला, “मग त्यांनी मला सांगितलं की दीपक देऊळकर त्याचे निर्माते आहेत. तू त्यांना एकदा भेट. मी नको म्हटलं मला पौराणिक मालिका नाही करायची आहे. पण, ते खूप मागे लागले मग मी एकदा भेटूयात म्हणून गेलो आणि विचार केला की नाही करायची आहे असं सांगूयात. मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथे १००-१५० मुलं होती ऑडिशनसाठी. त्यांनी मला स्क्रिप्ट दिली मी हिंदीमध्ये ऐतिहासिक, पौराणिक मालिका केल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे अनुभव होताच. मी ऑडिशन दिली. त्यांना ती आवडली. तेव्हा त्यांनी मला तू शर्ट काढशील का असं विचारलं मी म्हटलं का सर? ते म्हणाले नाही आम्हाला तुझी शरीरयष्टी पाहायची आहे. कारण ही जी भूमिका आहे त्यात तुझ्या अंगावर काही नसणार आहे. रुद्राक्ष आणि माळा असतील. मग मी म्हटलं ठिके. मग मी शर्ट काढला तेव्हा मला खूप संकोच वाटला होता. त्यांनी रेकॉर्ड वगैरे केलं मी फिट होतो पण, तितका नाही. मग मी घरी आलो.”
मंदार ऑडिशनबद्दल म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मंदार आम्ही तुझी या भूमिकेसाठी निवड करत आहोत. तू तुझी बॉडी बनव. तयारी कर. अशा पद्धतीने माझी मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री झाली. त्यामुळे मला असं वाटतं की दत्त गुरुंची ही इच्छा होती की मी ही भूमिका साकारावी.”
