Mandar Jadhav Struggle Story : मंदार जाधव छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेता खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून. यामधील त्याच्या जयदीप या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता.
मंदार जाधवने खरंतर मराठी नाही तर हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्याने ‘अल्लादीन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत या क्षेत्रात पदार्पण केलं. त्याची या क्षेत्रात अचानकच एन्ट्री झाली. मनोरंजनविश्वात काम करण्याचा त्याचा कोणताही निर्णय झालेला नसताना अचानक त्याला संधी मिळाली आणि त्याने ती स्वीकारली असं त्याने ‘सारं काही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
‘अशी’ मिळाली पहिली मालिका
मंदारने त्याला त्याची पहिली मालिका ‘अल्लादीन’ कशी मिळाली याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “माझा लहान भाऊ मेघन जाधवबरोबर मी ऑडिशनला गेलो होतो त्याला पाठिंबा द्यायला म्हणून पण, तिथे मलाच विचारणा झाली. ते म्हणाले की आम्ही जशा मुलाच्या शोधात आहोत तू तसाच आहेस तू या मालिकेत काम करशील का असं म्हणाले आणि मीसुद्धा हो मी पण करेन असं म्हणालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. त्यामुळे माझी पहिली मालिका मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला नाही.”
मंदारने यावेळी पहिली मालिका जितक्या सहजासहजी मिळाली त्याहीपेक्षा कठोर मेहनत त्याला दुसरं काम मिळवण्यासाठी घ्यावी लागली असं सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “हो संघर्ष आहे. कलाकार म्हणून काम करणं कठीण असतं. माझी पहिली मालिका संपली तेव्हा मला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. दोन अडीच वर्षे ती सुरू होती, पण ती मालिका संपल्यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. जरी मला अभिनेता व्हायचं नव्हतं तरी माझ्या नशिबात ते लिहिलं होतं त्यामुळे ती मालिका करत असताना मला अभिनय आवडतो याची जाणीव झाली.”
संघर्षाबद्दल मंदार म्हणाला, “ती मालिका संपली तेव्हा मी खूप बारीक होतो. त्यामुळे मी जेव्हा ऑडिशनला जायचो तेव्हा तू खूप बारीक आहेस. जरा बॉडी बनव, चांगलं खा आणि नायकासारखं बन आधी. तेव्हा मला जाणवलं की हो जर तुम्हाला काम मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. मी अजिबात तसा दिसत नव्हतो. मग मी स्वत:वर काम केलं. त्यावेळी मी जवळपास ७००-८०० ऑडिशन दिल्या चार ते पाच वर्षे हे सुरू होतं आणि मला बऱ्याचदा नकार मिळाला.”
मंदार पुढे म्हणाला, “घरी परिस्थिती तशी बरी होती. चाळीत राहायचो आम्ही. मी तिथे वाढलो आहे त्याचा मला आनंद आहे. पण, संघर्षाबद्दल बोलायचं झालं तर मला दुसरं काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जिथे जायचो तिथे नकार मिळत होता. तेव्हा मी ठरवलेलं की मी एक चांगली मालिका केली आहे. त्यात छान काम केलंय त्यामुळे आपण इथेच थांबायला हवं. आई-बाबांचा पाठिंबा होता त्यामुळे मी त्यातून बाहेर आलो. बाबासुद्धा या क्षेत्रात काम करत असल्याने त्यांना याची जाणीव होती. या क्षेत्रातील संघर्ष माहीत होता.”
