मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून मंदार जाधवला ओळखलं जातं. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे मंदार घराघरांत पोहोचला आणि हळुहळू त्याची जयदीप अशी ओळख निर्माण झाली. आज मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण, एक काळ असा होता…ज्यावेळी मंदारकडे जवळपास ४ ते ५ वर्षे काहीच काम नव्हतं. या कठीण प्रसंगाबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
मंदार जाधव ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना म्हणाला, “मी लहानपणी फार हट्टी होतो. पण, आयुष्यात असा एक काळ येतो…त्या काळात मी संयम ठेवायला शिकलो. कारण, चार-पाच वर्ष हा खूप मोठा काळ आहे. ज्या वयात तुमचं खऱ्या अर्थाने करिअर घडतं…त्याच वयात मी घरी बसलो होतो. त्या वयात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मग, त्या क्षणाला असंही वाटलं की आपण आपलं आयुष्य संपवून टाकावं. कारण, आपण कदाचित इतरांपेक्षा फार कमी आहोत आणि आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. मला काहीच येत नाही…मी सक्षम नाहीये असे सगळे विचार माझ्या मनात सुरू होते.”
मंदार पुढे म्हणाला, “माझ्या आई-बाबांना सुद्धा ही गोष्ट माहिती नाहीये. पण, आज मी याबद्दल सांगतोय…त्यावेळी मी इतका तणावात होतो की, मला असंही वाटलं आता आपण जीव द्यावा. आमचं घर नवव्या माळ्यावर होतं आणि बाहेर बाल्कनी होती. एक दिवस मनात असा विचार आला की, या बाल्कनीत उभं राहावं आणि खाली उडी मारावी. पण, दुसऱ्या क्षणी मनात असाही विचार आला…जर मी चुकून वाचलो, हात-पाय मोडले तर मला आयुष्यभर व्हिलचेअरवर बसून राहावं लागेल. संपलो तर ठिक आहे पण, वाचलो तर अजून वाईट परिस्थिती आहे. आता मी हे सगळं हसण्यावर घेतोय पण, तेव्हाची परिस्थिती फार वेगळी आहे. कारण, ‘अलादीन’सारखा यशस्वी प्रोजेक्ट केल्यावर मी घरी बसलो होतो…माझ्याकडे काम नव्हतं.”
“माझ्यावर तेव्हा एक वेगळंच प्रेशर होतं की, इतका मोठा शो करूनही मला काम मिळत नाहीये. मग, मनात तो विचार आला.. चुकून यात वाचलो तर व्हिलचेअरवर बसावं लागेल. त्यादिवशी ठरवलं आता आपण अजून प्रयत्न केले पाहिजेत. त्या दिवसापासून मी त्याच गॅलरीत व्यायाम करायला सुरुवात केली. मी रोज १०० सूर्यनमस्कार, १०० बैठका मारल्या. त्यानंतर बाबांकडून पैसे घेऊन स्किपिंग रोप विकत घेतला. त्याच गॅलरीत मी व्यायामाला सुरुवात केली आणि आता ते सगळं मी अजूनपर्यंत फॉलो करतोय. तेव्हापासून मी व्यायाम कधीच सोडला नाही.”
“त्या क्षणापासून माझं आयुष्य बदललं. मी स्वत:ची समजूत काढली. कदाचित आपण अजून जास्त मेहनत केली पाहिजे याची जाणीव मला झाली. त्यानंतर मी खूप पेशन्स ठेवले, स्वत:च्या फिजिकवर खूप काम केलं. तू हीरोसारखा दिसत नाहीये असं सांगून जर आपल्याला रिजेक्ट केलं जातंय, तर सगळ्यात आधी आपण हीरोसारखं व्हायला पाहिजे असा विचार मी केला होता आणि आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे.” असं मंदारने आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं.
